Dry Weather Pune :पुण्यात ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांत केवळ १.४ मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या १२ वर्षांतील हा सर्वात कोरडा पंधरवडा ठरला आहे. पावसाने ओढ दिल्याने शहरातील तापमानात वाढ झाली असून, नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे.जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे झाडे आणि वनक्षेत्रातील कोरड्या गवतामुळे वणवा लागण्याचा धोकाही वाढला आहे.
पुणे शहरात यंदा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने मोठी दडी मारली आहे. गेल्या १२ वर्षांतील सर्वात कोरडा ऑक्टोबर पंधरवडा म्हणून या कालावधीची नोंद झाली असून, बदलत्या हवामानाचा परिणाम आता शहराच्या पाणीपुरवठ्यावर आणि पर्यावरणावर दिसू लागला आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान शिवाजीनगर वेधशाळेत केवळ १.४ मिमी पावसाची नोंद झाली.
पावसाअभावी पाणीपुरवठ्यावर ताण
ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पाण्याच्या व्यवस्थापनाचे आव्हान वाढले आहे. (Pune Weather)पुण्यातील काही निवासी सोसायट्यांना पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे वृत्त आहे. विशेषतः विमाननगर परिसरातील काही सोसायट्यांनी महापालिकेकडे टँकरची मागणी केली आहे. खासगी टँकरची मागणीही वाढल्याचे सांगितले जात आहे.
कोरड्या हवामानामुळे वणव्याचा धोका
पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला असून, गवत आणि झुडपे कोरडी पडत आहेत. त्यामुळे वनक्षेत्रात आग लागण्याचा धोका वाढला आहे. पुण्यातील आनंदवन (Forest Fire Risk)राखीव वनक्षेत्रात आग लागल्याची घटना समोर आली असून, सुमारे २०० झाडांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या परिस्थितीमुळे वनक्षेत्राचे संरक्षण आणि आग प्रतिबंधक उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.
उष्णतेतही वाढ; पावसाची प्रतीक्षा
पावसाचे प्रमाण कमी असतानाच पुण्यात दिवसाचे तापमानही वाढले आहे. १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान शिवाजीनगर येथे कमाल तापमानाची सरासरी ३४.९७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. २०१४ नंतरच्या याच कालावधीतील हे सर्वाधिक सरासरी कमाल तापमान असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हवामान विभागाने १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान पुणे जिल्हा आणि घाट परिसरातील काही भागांसाठी मेघगर्जना, हलका पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. पावसाची कमतरता, (Rising Temperature) वाढते तापमान आणि पाणीपुरवठ्यावरील ताण पाहता पुणेकरांनी पाण्याचा जपून वापर करणे आणि परिसरातील आगीच्या घटनांबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्येच उन्हाचा चटका! पुणे-मुंबईत तापमान वाढलं; उद्याचं हवामान कसं असेल?









