Amravati MLC Election: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अवघ्या ४५३ मतदारांच्या या रागसंग्रामात कोणाचा गेम होणार आणि कोणाची लॉटरी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अवघ्या ४५३ मतदारांच्या मतदानावर या निवडणुकीचे भवितव्य ठरणार असल्याने प्रत्येक पक्षाने जोरदार रणनीती आखायला सुरुवात केली आहे. कोण बाजी मारणार आणि कोणाला पराभव स्वीकारावा लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
हेही वाचा:
राजकीय हालचालींना वेग
निवडणूक जाहीर होताच विविध पक्षांमध्ये उमेदवारीसाठी हालचाली वाढल्या आहेत. भाजपकडून प्रवीण पोटे यांनी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतमोजणी वेळापत्रक
१ जून २०२६ ला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम प्रक्रिया आहे.
२ जून २०२६ ला अर्जाची छाननी होणार आहे.
४ जून २०२६ उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख आहे.
या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. तर २५ मे रोजी अधिकृत अधिसूचना जारी होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
453 मतदारांचा निर्णायक प्रभाव
या मतदारसंघात एकूण ४५३ मतदार असून त्यात महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत तसेच स्वीकृत सदस्यांचा समावेश आहे. याच मतांवर उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
सत्ताधाऱ्यांचे गणित
महायुतीकडे सुमारे २४८ मतांचे बळ असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांची स्थिती तुलनेने मजबूत मानली जात आहे. विविध घटक पक्षांचा यात महत्वाचा वाटा आहे.
विरोधकांचे समीकरण
महाविकास आघाडीकडे अंदाज १५३ मतांचे समर्थन असल्याचे चित्र आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्रितपणे निवडणुकीत आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक
एमआयएम आणि इतर लहान गट तसेच अपक्ष मिळून सुमारे 50 मतं निर्णायक ठरू शकतात. हे मतांचे समीकरणच अंतिम निकाल बदलण्याची क्षमता ठेवते.
उत्सुकता वाढली
अमरावतीच्या या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला धक्का बसणार आणि कोणाचे राजकीय गणित बिघडणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.












