Onion Protest Maharashtra: आज २६ मे रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी सरकारविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सर्वजण गळयात कांद्याच्या माळा घालून बैलगाडीवरून घोषणाबाजी देताना दिसत आहेत.
कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कांदा दरवाढ आणि हमीभावाच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने आज नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनात बैलगाडी, कांद्याच्या माळा आणि जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला.
हेही वाचा: महायुतीतील जागावाटपावरून तणाव? एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची गुप्त बैठक, नेमकी काय झाली चर्चा?
नाशिक- पश्चिम महाराष्ट्र रास्ता रोको
नाशिक आणि आसपासच्या भागात शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. मुंबई- आग्रा महामार्गावर चांदवड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात घोषणाबाजी
आंदोलनादरम्यान शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याला योग्य दर मिळावा, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा आणि सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.
महाविकास आघाडीचे नेते मैदानात
या आंदोलनात रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते सहभागी झाले. मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. नेत्यांनी सरकारवर कांदा धोरणाबाबत गंभीर आरोप करत शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा दावा केला.
बैलगाडी आंदोलनात गोंधळ
आंदोलनादरम्यान बैलगाडी मोर्चात काही काळ गोंधळ निर्माण झाला. बैल बिथरल्याने नेत्यांना खाली उतरून पायी मोर्चात सहभागी व्हावे लागले. तरीही आंदोलन सुरूच राहिले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच होती.
गंगापूर बाजार समितीतही आंदोलन
गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अत्यल्प दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. काही ठिकाणी कांद्याला अत्यंत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून ‘रास्ता रोको’ केला.












