Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • रेल्वे भरतीला आलेल्या भैय्यांना चोपलं, राज ठाकरे निर्दोष मुक्त झाले
Top News

रेल्वे भरतीला आलेल्या भैय्यांना चोपलं, राज ठाकरे निर्दोष मुक्त झाले

Raj Thackeray railway recruitment case

Raj Thackeray railway recruitment case : सत्ता असो किंवा नसो मात्र, मतपेटीत मतं असो किंवा नसो, तरुणाईच्या गळ्यातले ताईत आणि ज्यांच्या सभेला हजारोंचा जनसमूदाय जमा होतो ते नाव म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. त्यांच्याकडे निवडून आलेल्या सदस्यांची संख्या असो किंवा नसो मात्र, प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांची दखल घ्यावीच लागते. राज ठाकरे आज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याचे कारण म्हणजे त्यांनी २००८ साली उत्तर भारतीय तरूणांना मारहाण आणि भडकावू वक्तव्य केल्याच्या आरोपातून त्यांना निर्दोश मुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तब्बल सोळा वर्षांपूर्वीच्या एका अत्यंत गाजलेल्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या खटल्यातून आज ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पूर्णपणे निर्दोष मुक्त केले आहे.

२००८ मधील रेल्वे भरती परीक्षा आंदोलन, कल्याण रेल्वे स्थानकावर झालेली तोडफोड, उत्तर भारतीय उमेदवारांना झालेली मारहाण आणि कार्यकर्त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा राज ठाकरे यांच्यावर असलेला चिथावणीखोर भाषणाचा आरोप. या सर्वांमधून न्यायालयाने राज ठाकरेंसह सर्व मनसे पदाधिकाऱ्यांची सप्रमाण सुटका केली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी आज दुपारच्या सत्रात हा ऐतिहासिक निकाल सुनावला. सरकारी पक्ष राज ठाकरे यांच्यावरील एकही आरोप न्यायालयात सिद्ध करू शकला नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने हा खटला निकाली काढला आहे. सोळा वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाईचा आज अखेर शेवट झाला असून मनसे वर्तुळात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर या निकालाचे मोठे पडसाद उमटत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतरचा सुरुवातीचा काळ

या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे ऑक्टोबर २००८ मध्ये रोवली गेली होती. तो काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतरचा सुरुवातीचा काळ होता. पक्ष ‘मराठी पाऊल पुढे’ आणि ‘स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य’ या मुद्द्यांवरून आक्रमक आंदोलने करत होता. याच दरम्यान रेल्वे प्रशासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मुंबई, कल्याण आणि ठाणे परिसरातील विविध केंद्रांवर परीक्षांचे आयोजन केले होते. या परीक्षेसाठी बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर उत्तर भारतीय राज्यांमधून हजारो उमेदवार विशेष रेल्वे गाड्यांनी मुंबई आणि उपनगरांमध्ये आले होते.

परप्रांतीय उमेदवारांना झुकते माप असा मनसेचा मुख्य आक्षेप

मनसेचा त्याकाळी थेट आरोप होता की, महाराष्ट्रातील रेल्वेच्या नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे आणि परप्रांतीय उमेदवारांना झुकते माप दिले जात आहे. रेल्वे भरतीची माहिती देणाऱ्या जाहिराती स्थानिक मराठी वृत्तपत्रांमध्ये न छापता, केवळ उत्तर भारतातील हिंदी वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केल्या गेल्या, असा मनसेचा मुख्य आक्षेप होता. या मुद्द्यावरून मराठी तरुणांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. मनसेने या भरती प्रक्रियेला कडाडून विरोध दर्शवण्याचे आधीच जाहीर केले होते. त्यानुसार, ऑक्टोबर २००८ च्या उत्तरार्धात मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानक आणि परीक्षा केंद्रांच्या बाहेर एकत्र येत तीव्र निदर्शने सुरू केली.

उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण

या निदर्शनांचे रूपांतर पुढे मोठ्या गदारोळात आणि हिंसक आंदोलनात झाले. कल्याण रेल्वे स्थानकावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याचे आणि त्यांना परीक्षा देण्यापासून रोखल्याचे आरोप झाले. या आंदोलनादरम्यान रेल्वे स्थानकावरील खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या, तिकिट खिडक्यांचे नुकसान झाले आणि रेल्वेच्या मालमत्तेची मोठी तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कल्याण रेल्वे स्थानकावरील हिंसाचारानंतर रेल्वे पोलिसांनी आणि स्थानिक कल्याण पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान शासकीय कामात अडथळा कलमांखाली गुन्हे दाखल

मनसे कार्यकर्त्यांवर दंगल घडवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि शासकीय कामात अडथळा आणणे यासारख्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले. मात्र, पोलिसांच्या तपासाची मुख्य सुई मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे वळाली. पोलिसांनी असा दावा केला की, राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या सभांमध्ये आणि माध्यमांसमोर जी आक्रमक विधाने केली होती, ती चिथावणीखोर होती. त्यांच्या या भाषणांमुळे आणि आवाहनामुळेच मनसे कार्यकर्ते प्रक्षोभित झाले आणि त्यांनी कल्याणमध्ये हा हिंसाचार घडवून आणला. त्यामुळे राज ठाकरे यांना या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार आणि चिथावणी देणारे आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले.

राज ठाकरे यांना ऑक्टोबर २००८ मध्ये रत्नागिरी येथून अटक

या गुन्ह्याप्रकरणी राज ठाकरे यांना ऑक्टोबर २००८ मध्ये रत्नागिरी येथून अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. अनेक ठिकाणी एसटी बसेसची तोडफोड झाली, रस्ते अडवण्यात आले आणि बंद पाळण्यात आला. राज ठाकरे यांना कल्याण न्यायालयात हजर केले जात असताना न्यायालय परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. त्यावेळी त्यांना जामीन मंजूर झाला होता, परंतु त्यांच्यावरील कायदेशीर खटल्याची प्रक्रिया ठाणे न्यायालयात सलग सोळा वर्षे सुरू राहिली.

१३ मे २०२६ रोजी राज ठाकरे स्वतः ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर

या खटल्यामध्ये राज ठाकरे यांच्यासह एकूण ८ मनसे कार्यकर्त्यांना आरोपी करण्यात आले होते. २००८ पासून सुरू झालेली ही कायदेशीर लढाई अत्यंत संथ गतीने आणि अनेक कायदेशीर चढ-उतारांमधून पुढे गेली. गेल्या सोळा वर्षांत या खटल्याच्या शेकडो सुनावण्या झाल्या. अनेक न्यायाधीशांची बदली झाली, सरकारी वकील बदलले आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया वर्षानुवर्षे चालली. या प्रदीर्घ कालावधीत एक मोठी दुःखद घटनाही घडली. मूळ ८ आरोपींपैकी दोन मनसे कार्यकर्त्यांचे या सोळा वर्षांच्या काळात वेगवेगळ्या कारणांनी निधन झाले. त्यामुळे हा खटला राज ठाकरेंसह उर्वरित ६ आरोपींवरच चालवला जात होता. या खटल्याच्या अंतिम टप्प्यात मे २०२६ च्या सुरुवातीला वेग आला. १३ मे २०२६ रोजी राज ठाकरे स्वतः ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर झाले होते. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१३ अंतर्गत आरोपीचा अंतिम जबाब नोंदवण्यासाठी ते न्यायालयात आले होते. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना राज ठाकरे यांनी अत्यंत शांतपणे आणि ठामपणे आपली बाजू मांडली.

माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे – राज

त्यांनी न्यायालयात सांगितले की, “माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे, राजकीय हेतूने प्रेरित आणि बनावट आहेत. ज्या दिवशी कल्याण रेल्वे स्थानकावर आंदोलन किंवा कथित हिंसाचार झाला, त्या दिवशी मी मुंबई किंवा ठाणे जिल्ह्यात उपस्थितच नव्हतो. मी काही पूर्वनियोजित राजकीय आणि वैयक्तिक कामासाठी नाशिक दौऱ्यावर गेलो होतो. माझा या हिंसाचाराशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही आणि मी कार्यकर्त्यांना कोणतीही चिथावणी दिली नव्हती. राज ठाकरे यांचा जबाब नोंदवल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या अंतिम युक्तिवादासाठी १८ मे २०२६ ही तारीख निश्चित केली होती. १८ मे रोजी राज ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील शैलेश सडेकर आणि सयाजी नांगरे यांनी न्यायालयात युक्तिवादाची धुरा सांभाळली. त्यांनी सरकारी पक्षाच्या तपासातील आणि पुराव्यांमधील अनेक गंभीर त्रुटी न्यायालयासमोर पुराव्यासहित मांडल्या.

मनसेच्या राजकीय प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी  आभिजीत कुलकर्णी यांनी या प्रकरणाचा निकाल २१ मे २०२६ म्हणजेच आजच्या दिवसासाठी राखून ठेवला होता. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ठाणे न्यायालयाकडे लागले होते. न्यायालय परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती, परिस्थिती पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. राज ठाकरे यांचे वकील न्यायालयात उपस्थित होते. मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी निकाल वाचनास सुरुवात केली आणि अवघ्या काही मिनिटांतच त्यांनी या खटल्यातील सर्व आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करत असल्याचा निर्णय जाहीर केला. १६ वर्षांपूर्वी गाजलेले हे ‘रेल्वे भरती आंदोलन’ मनसेच्या राजकीय प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानले जाते, ज्याने पक्षाला महाराष्ट्रात एक आक्रमक ‘मराठी अस्मितेची’ ओळख मिळवून दिली होती. आज त्या आंदोलनाशी संबंधित मुख्य खटल्यातून राज ठाकरे यांची झालेली निर्दोष मुक्तता ही मनसेसाठी आगामी काळातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि ऊर्जा देणारी ठरू शकते.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts