Maharashtra Legislative Council elections: राज्यातील विधान परिषेद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चर्चेनंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
राज्यातील विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधून भरल्या जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २५ मेपासून सुरू झाली असून १ जूनपर्यंत अर्ज भारत येणार आहेत. त्यानंतर २ जून रोजी अर्जाची छाननी होणार असून २२ जून रोजी मतदार पार पडणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार हालचाली सुरू होत्या. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अनेक बैठकी आणि चर्चांचे फेरे पार पडले. प्रत्येक पक्षाने अधिकाधिक जागांवर दावा केल्याने काही प्रमाणात तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते.
हेही वाचा: चित्रपट महामंडळ निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप? विजय पाटकर यांचा OSDवर आरोप
कोण किती जागा लढवणार?
मात्र आता महायुतीत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप सर्वाधिक १२ जागांवर उमेदवार देणार आहे. तर शिवसेना (शिंदे गट) ४ जागांवर निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १ जागा जाणार आहे.
शिवसेनेने किती जागांची मागणी केली होती?
शिवसेनेने सुरुवातीला सात जागांची मागणी केली होती. याआधीच्या निवडणुकांमध्ये पक्षाने तडजोड केल्याचा मुद्दा उपस्थित करत यावेळी अधिक जागांवर ठाम भूमिका घेतली गेली होती. मात्र अंतिम चर्चेनंतर पक्षाला चार जागांवर समाधान मानावे लागल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी-हिंगोली या मतदारसंघांमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ देण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपने मात्र पुणे मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे.
अंतिम शिक्कामोर्तब
दरम्यान, या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतील तिन्ही प्रमुख नेत्यांच्या चर्चेनंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.












