चेन्नई CSK vs KKR Match Today : आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघ खूपच खराब फॉर्ममध्ये आहेत. केकेआरला अजून या हंगामात विजयाचं खातं उघडायचं आहे, तर सीएसकेने उशिरा का होईना, आपल्या विजयाची मालिका सुरु केली आहे. आजचा सामना रंजक असेल, पण ही लढत गुणतालिकेतील सर्वात खालच्या स्थानावर असलेल्या दोन संघांमध्ये आहे. दोन्ही संघ एकमेकांवर मात करुन पुढं जाण्याचा प्रयत्न करतील (CSK vs KKR Match).
हेही वाचा : नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? नावही ठरलं
संजू सॅमसनचा फॉर्म केकेआरसाठी चिंतेचं कारण :
सीएसके आणि केकेआर यांच्यातील आयपीएल सामना आज संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल. सीएसकेसाठी चांगली बातमी ही आहे की, संजू सॅमसननं मागील सामन्यात शानदार शतक झळकावून आपण पुन्हा फॉर्ममध्ये आलो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानं 115 धावांची नाबाद खेळी केली. जर तो असाच फलंदाजी करत राहिला, तर केकेआरसाठी नक्कीच अवघड जाईल यात शंका नाही.
सीएसकेकडे नवीन गोलंदाजी आक्रमण :
सीएसकेकडे सध्या पूर्णपणे नवीन गोलंदाजी आक्रमण आहे. विशेषतः फिरकी गोलंदाज नवीन आहेत. अफगाणिस्तानचा नूर अहमद आणि वेस्ट इंडिजचा अकील होसेन ही जबाबदारी सांभाळत आहेत. खलील अहमद वेगवान गोलंदाजीनं सुरुवात करतो. तो चांगला स्विंग निर्माण करतो, जी केकेआरसाठी चांगली गोष्ट नाही. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदाही सीएसकेला होऊ शकतो. अलीकडच्या काळात अनेक संघांनी घरच्या मैदानावर सीएसकेला हरवलं असलं तरी, केकेआर त्यांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमकुवत दिसत आहे.
केकेआरसमोर अनेक आव्हानं :
केकेआरबद्दल बोलायचं झाल्यास, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाला अजूनही आपली लय सापडलेला नाही. संघाला एक गुण मिळाला आहे, तोही सामना रद्द झाल्यामुळं. संघाची सलामीची जोडी चांगली कामगिरी करत नाही. मधली फळीही पूर्णपणे अपयशी ठरत आहे. सर्वात महागडा खेळाडू म्हणून संघात आलेला कॅमेरॉन ग्रीन धावाही करत नाहीये आणि विकेट्सही घेत नाहीये, ही संघासाठी एक मोठी चिंतेची बाब आहे. आजच्या सामन्यात सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी चांगली कामगिरी केली तरच संघाला जिंकण्याची संधी मिळेल.
धोनीबाबतचे चित्र अजूनही अस्पष्ट :
दरम्यान, एमएस धोनी दुखापतीतून सावरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो सोमवारी मैदानावर उतरला आणि त्यानं फलंदाजीचा सराव केला असून तो लवकरच पूर्णपणे बरा होईल. मात्र, चेन्नई व्यवस्थापन त्याच्याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. तो आज खेळेल याची खात्री नसली तरी, त्याच्या पुनरागमनामुळं संघ मजबूत होईल. कर्णधार ऋतुराज गायकवाडलाही एक चांगला सल्लागार मिळेल.












