मुंबई SRH Beat MI : आयपीएल 2026 च्या 41व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादकडून 6 गडी राखून पराभव झाला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं 243 धावा केल्या, जी आयपीएलच्या इतिहासातील त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. मात्र, हैदराबादच्या फलंदाजांनी 19 व्या षटकातच हे लक्ष्य पूर्ण केलं. विशेष म्हणजे या हंगामातील हैदराबादचा हा सलग पाचवा विजय आहे.
हेही वाचा : रियान परागनं लाईव्ह सामन्यात ओढली ई-सिगारेट? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, BCCI कारवाई करणार?
मुंबईची प्रथम फलंदाजी :
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, मुंबई इंडियन्सनं 20 षटकांत 5 गडी गमावून 243 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर रायन रिकल्टननं शानदार नाबाद 123 धावा केल्या, त्यानंतर विल जॅक्सनं 46 आणि कर्णधार हार्दिक पांड्यानं 31 धावा केल्या. गोलंदाजीत सनरायझर्स हैदराबादकडून प्रफुल्ल हिंगेनं दोन बळी घेतले, तर इशान मलिंगा, शकिब हुसेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
हैदराबादचा सहज विजय :
लक्ष्याचा पाठलाग करताना, सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी करुन संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. अभिषेक 45 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. ट्रॅव्हिस हेडनंही 76 धावांची शानदार खेळी केली. या दोघांच्या विकेटनंतर, हेनरिक क्लासेननं सूत्रे हाती घेतली आणि 30 चेंडूंमध्ये नाबाद 65 धावा करुन हैदराबादला विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सकडून ए.एम. गझनफरनं दोन, तर ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पांड्यानं प्रत्येकी एक बळी घेतला.












