मुल्लानपूर Riyan Parag : आयपीएल 2026 चा 40 वा सामना मंगळवारी मुल्लानपूर इथं पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. राजस्थाननं हा सामना 6 गडी राखून जिंकला. विशेष म्हणजे, राजस्थान रॉयल्सनं पंजाब किंग्सची विजयी मालिका खंडित केली. आयपीएल 2026 मध्ये पंजाबला पहिल्या पराभवाला सामोरे जावं लागलं.
हेही वाचा : वातावरण तापलं! अयान व्हिडिओ प्रकरणानंतर परतवाडात राणेंची सभा
रियान परागच्या कृतीची चर्चा :
मात्र, सध्या सर्वाधिक चर्चा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागबद्दल होत आहे. सामन्यादरम्यान रियान पराग ड्रेसिंग रुममध्ये धूम्रपान करताना दिसला. तो ई-सिगारेट ओढत (व्हेपिंग) होता. ही घटना राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या 16व्या षटकादरम्यान घडली. पराग स्पष्टपणे व्हेपिंग करताना दिसला. त्याचा व्हेपिंग करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. यानंतर आता सामनाधिकारी त्याच्यावर कारवाई करु शकतात. परागला त्याच्या कृत्याबद्दल शिक्षा होऊ शकते.
भारतात ई-सिगारेटवर बंदी :
सर्वप्रथम, रियान परागनं राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये केलेल्या कृत्यामुळं खळबळ का माजली आहे, हे समजून घेऊया. या खळबळीचं कारण म्हणजे भारतात ई-सिगारेटवर असलेली बंदी. भारतात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा 2019 अंतर्गत यावर बंदी घालण्यात आली आहे, ज्याचं उल्लंघन केल्यास मोठा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
परागवर मोठी कारवाई होण्याची शक्यता :
याव्यतिरिक्त, स्टेडियमच्या सुरक्षा नियमांनुसार, आयपीएलची सर्व ठिकाणं ‘धूम्रपान-मुक्त’ क्षेत्रे आहेत. खेळाडू आणि अधिकाऱ्यांची प्रवेशद्वारांवर तपासणी केली जाते आणि त्यांना आतमध्ये लायटर, काड्यापेटी किंवा धूम्रपानाची कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणं नेण्याची परवानगी नसते. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 नुसार, हे नियम मोडणं खेळाचा अपमान मानलं जातं. यासाठी, सामनाधिकारी खेळाडूला फटकारु शकतात, त्यांचं सामना शुल्क कापू शकतात किंवा बंदी (निलंबन) देखील घालू शकतात.












