रत्नागिरी: कोकण कोस्टल हाफ मॅरेथान नवीन वर्षात पहिल्या रविवारी, ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या तिसऱ्या पर्वामधे 300 पेक्षा अधिक शहरे, 12 राज्यांमधून 2200 पेक्षा अधिक फिटनेस टुरिस्ट रत्नागिरीत येणार आहेत. संपूर्ण जगासाठी आयोजित केलेल्या या हाफ मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी सर्व कोकणवासीय सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून झटत आहेत, अशी माहिती बुधवारी शहरातील मांडवी येथील हाॅटेल सी फॅन्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हे ही वाचा : मुंबई महापौर पदावरून भाजपमध्येच मतभेद, किरीट सोमय्याने लोढांना फटकारलं
सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक आणि या स्पर्धेचे आयोजक प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले की, जगात आतापर्यंत एकही अर्ध मॅरेथॉन कुठल्याही भाषेसाठी समर्पित केली गेलेली नाही. मॅरेथॉनदरम्यान जास्तीत जास्त मराठी संज्ञांचा वापर केलेला असेल. उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या माध्यमातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, राज्याचा मराठी भाषा विभाग हे या उपक्रमाचे प्रमुख प्रायोजक तसेच अन्यही विशेष प्रायोजक आहेत. या उपक्रमामध्ये भारताबाहेर राहणारे धावपटू आभासी पद्धतीने सहभागी होतील. आर्यक सोल्युशन्स या आयटी कंपनीच्या माध्यमातून यासाठी विशेष ॲप बनवण्यात येत असल्याची माहिती आर्यक सोल्युशन्सचे प्रशांत आचार्य यांनी दिली.
हिने गायले मॅरेथॉनचे गाणे
21 किमीचा एक दिशा मार्ग, आंब्याच्या आकाराचे मेडल, समुद्र किनारी सांगता, 9 गावांमधून जैवविविधता अनुभवता येणारा मार्ग आणि समुद्र किनारी मिळणारा उकडीचा मोदक हे या उपक्रमाला सर्वांपेक्षा वेगळं बनविणार आहे. मॅरेथॉनआधी झुम्बा सेशन तसेच आयपॉपस्टारफेम राधिका भिडे हिने या मॅरेथॉनचे गाणे तयार केले आहे.
View this post on Instagram
स्थानिकांचा सहभाग स्पर्धेला जास्त मोठा बनवतो
रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने होणारी ही मॅरेथॉन घेण्यामागचा हेतू अतिशय प्रामाणिक असतो, असे असोसिएशनचे संदीप तावडे यांनी नमूद केले. स्थानिकांचा मोठा सहभाग कुठल्याही स्पर्धेला जास्त मोठा बनवतो. म्हणूनच सर्व कोकणवासीयांनी हक्काच्या या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थळी यांनी केले आहे.
20 डिसेंबर मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख
20 डिसेंबर ही या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे. ऑफलाइन नोंदणीची सुविधा आनंद सागर अपार्टमेंट, मजगाव रोड इथे कोकण कोस्टल मॅरेथॉन ऑफीसमध्ये करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेवेळी मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई, कौस्तुभ सावंत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, ॲड. सचिन नाचणकर आणि डॉ. राज कवडे आदी उपस्थित होते.






