Mira Road | बकरी ईद (Bakri Eid) हा सण जवळ आला असतानाच मुंबईत (Mumbai) त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप पक्षाच्या काही आमदारांनी, महापौर आणि उपमहापौरांनी मुंबईत बकऱ्यांची कुर्बानी देण्यावर बंदी घालावी, अशा महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे. याबाबत भाजप नेत्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देखील लिहिलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर, पराग शाह, माजी खासदार किरीट सोमय्या, मनोज कोटक, मनीषा चौधरी यांच्यासह अनेक आमदार आणि खासदारांनी आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात हाऊसिंग सोसायटी आणि चाळीमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अशातच या मुद्द्यावरून आता मुंबईतील मीरा रोडवर (Mira Road) हिंदू आणि मुस्लीम आमनेसामने आले असून मोठा राडा झाला आहे.
मीरा रोडवर नेमकं घडलं काय? का आले हिंदू-मुस्लीम आमनेसामने?
बकरी ईदच्या आधी मुंबईजवळच्या मीरा रोडवर मोठा गदारोळ झाला आहे. मीरा रोडवरील पूनम क्लस्टर सोसायटीमध्ये एक शेड बांधण्यात आले होते. तर ते शेड पाडल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. ते शेड मुस्लिम समाजाच्या सदस्यांनी कुर्बानीच्या बकऱ्यांसाठी बांधले होते. मात्र, हिंदू समाजाच्या तक्रारीनंतर स्थानिक नगरपालिकेने हस्तक्षेप करून ते पाडले आणि या पाडकामावरून मोठा राडा झाला.
कुर्बानीच्या बकऱ्यांसाठी बांधण्यात आलेली शेड नगरपालिकेने हस्तक्षेप करून पाडली. त्यानंतर रात्रीच्या वेळी पुन्हा ते शेड बांधायला सुरुवात झाली असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर काही हिंदू संघटनांचे लोक तिथे जमू लागले आणि दोन्ही गटांमध्ये बाचाबाची आणि झटापट झाली आणि ब्लेडने हल्लाही करण्यात आला. त्यामुळे चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर मुस्लीम पक्षाने एका हिंदू तरूणावर ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही धक्कादायक घटना मीरा रोडवरील पूनम क्लस्टर 1 मधील सृष्टी कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये घडली. सुरुवातीला तेथील स्थानिक रहिवाशांनी केलेल्या विरोधानंतर कुर्बानीच्या बकऱ्यांसाठीचा शेड पाडला जात होता. मात्र, त्यानंतर मुस्लिम समाजाने विरोध सुरू केला आणि काशी मीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती समजावून सांगून दोन्ही बाजूंना शांत केले. मात्र, रात्री पुन्हा एकदा या मुद्द्यावरून वाद पेटला आणि तो हाणामारीपर्यंत पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त असून ते या घटनेचा पुढील तपास करत आहेत.











