नवी दिल्ली Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Lok Sabha) लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेवर बोलताना म्हणाले, “एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे की, ही तीन विधेयकं: घटनादुरुस्ती विधेयक, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणूक कायद्यात सुधारणा करणारा कायदा, यामुळं लोकसभेतील दक्षिणेतील राज्यांचं संख्याबळ कमी होईल आणि आपल्या दक्षिणेकडील राज्यांना (south indian states) मोठं नुकसान सोसावं लागेल. कर्नाटकमध्ये 28 जागा आहेत. या घटनादुरुस्तीनंतर कर्नाटकची संख्या 28 वरुन 42 होईल, कर्नाटकला अजिबात नुकसान होणार नाही.”
हेही वाचा : “सरकार महिला आरक्षण विधेयकाचा राजकीय वापर करत आहे,”; प्रियंका गांधी
दक्षिण भारतीय राज्यांमधील जागा :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेवर बोलताना म्हणाले, “आंध्र प्रदेशमध्ये सध्या 25 जागा आहेत. त्याचं सध्याचे प्रतिनिधित्व 4.60% आहे. यात अंदाजे 50% वाढ होऊन एकूण संख्या 38 होईल. तेलंगणामध्ये सध्या 17 जागा असून, ते 3.13% प्रतिनिधित्व करतात. या वाढीनंतर, त्यांच्याकडे 26 जागा असतील, जे त्यांच्या एकूण संख्याबळाच्या 3.18% असेल. मी तामिळनाडूच्या लोकांनाही आश्वासन देतो की त्यांचं संख्याबळ कमी होणार नाही, उलट वाढेल. सध्या तामिळनाडूमधून 39 खासदार निवडून येतात, जे त्यांच्या एकूण संख्याबळाच्या 7.18% आहे. या वाढीनंतर, खासदारांची संख्या 59 होईल, जे नवीन सभागृहातील एकूण संख्याबळाच्या 7.23% असेल. तामिळनाडूचंही कोणतंही नुकसान होणार नाही.”
अमित शाहांनी सांगितली सगळी आकडेवारी :
कर्नाटकमध्ये सध्या लोकसभेच्या 28 जागा असून, ते त्यांच्या एकूण संख्याबळाच्या 5.15% आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर, कर्नाटकच्या लोकसभा जागा 42 होतील, ज्यामुळं त्यांची एकूण संख्या 5.44% होईल. कर्नाटकचं कोणतंही नुकसान होणार नाही. केरळमध्ये 20 लोकसभा जागा असून, त्या सभागृहाच्या 3.68 टक्के आहेत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर झाल्यानंतर, खासदारांची संख्या 30 होईल आणि नवीन सभागृहात त्यांची टक्केवारी 3.67 टक्के असेल. एकूणच दक्षिणेसाठी असा समज निर्माण केला जात आहे की, सध्या 543 जागांपैकी दक्षिणेकडील 129 खासदार एकूण जागांच्या 23.76% आहेत. 50% वाढीनंतर, दक्षिणेकडील 195 खासदार असतील, जे एकूण जागांच्या 23.97% असतील.
प्रियंका गांधींना अमित शाह यांचं प्रत्युत्तर :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेत महिला आरक्षण आणि सीमांकन या विषयावर बोलताना म्हणाले, “सीमांकन आयोगाचा उल्लेख झाला की, तुम्ही तुमच्या लोकांना सीमांकन आयोगावर नियुक्त कराल आणि ते हे आणि ते करतील. मला प्रियंका गांधींना सांगायचं आहे की, आम्ही सीमांकन आयोगात कोणताही बदल केलेला नाही. आम्ही तुमच्या सीमांकन आयोग कायद्याचीच प्रतिकृती तयार केली आहे. जर तुम्ही त्यात फेरफार केला असेल, तर मी सांगू शकतो की आम्ही तसं करणार नाही.”
2029 पर्यंत जुन्या जागांवर निवडणुका घेतल्या जातील :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेवर लोकसभेत बोलताना म्हणाले, “तामिळनाडू आणि बंगालमध्ये निवडणुका सुरु असताना हा नवीन कायदा मंजूर करण्यात आला, अशी एक घटना घडली. मी हे स्पष्ट करतो की, या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी तेव्हाच होईल, जेव्हा संसद तो स्वीकारेल आणि राष्ट्रपती त्याला मंजुरी देतील. हा 2029 पूर्वी होण्याचा प्रश्नच नाही. जरी 2029 पर्यंत निवडणुका झाल्या, तरी त्या सर्व जुन्या जागांवर आणि जुन्या पद्धतीनुसारच घेतल्या जातील, त्यामुळं अखिलेश यादव यांना घाबरण्याचं काही कारण नाही.”












