Kangana Ranaut On Twisha Sharma Death Case | सध्या मॉडेल ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणाने (Twisha Sharma Death Case) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. सासरच्या घरी संशयास्पद स्थितीमध्ये ट्विशा शर्माचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. त्यामुळे या प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ट्विशाची हत्या तिच्या नवऱ्याने आणि सासूने केल्याचं म्हटलं जात आहे. तर या प्रकरणावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये आता बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतनेही (Kangana Ranaut) ट्विशा शर्मा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना रणौत नेमकं काय म्हणाली?
कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. तिनं म्हटलं आहे की, “आजकाल दररोज विवाहित तरुण महिलांबद्दल अनेक दुःखद आणि धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. यामध्ये अनेक सुशिक्षित महिला एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या पालकांकडे मदतीची याचना करतात. मात्र, भारतीय समाज लग्नानंतर मुलींना वाऱ्यावर सोडण्यासाठी कुप्रसिद्ध आहे”, अशी टीका कंगनाने केली आहे.
पुढे ती म्हणाली की, “माझा सर्व तरुण स्त्रियांना महत्त्वाचा सल्ला हा आहे की, सोशल मीडिया किंवा फॅशन, डेटिंग, लग्न किंवा मेकअप इंडस्ट्री तुम्हाला काय सांगत आहे ते ऐकू नका. इतर गोष्टींपेक्षा तुमच्या आयुष्यात तुमचे करिअर खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही करिअर घडवाल व्हाल तेव्हा लग्नाचा विचार करा. लक्षात ठेवा तुम्हाला स्वतःला तुमचा हिरो बनायचं आहे. कारण तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही. तुम्ही कोणाशी लग्न करता यापेक्षा तुम्ही काय करता आणि तुम्ही कोण आहात हे अधिक महत्त्वाचे आहे. तुम्हाला जसं हवं आहे तसं आयुष्य घडवा, बाकी कोणाचेही ऐकू नका”, असा खास सल्ला कंगनाने महिलांना दिला आहे.

कंगानची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ट्विशा शर्मा मृत्यूचे प्रकरण सध्या चर्चेत असतानाच कंगनाने ही पोस्ट शेअर केल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, ट्विशा शर्मा ही भोपाळमधील तिच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ट्विशा ही लग्नापासून मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होती. तिला तिचा नवरा मानसिकदृष्ट्या त्रास देत होता, असे आरोप तिच्या घरच्यांनी केले आहेत. तर या प्रकरणाबाबत दररोज नवनवीन खुलासे होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.












