Kannada Actor Harish Passes Away | रविवारी (12 एप्रिल) प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं दु:खद निधन झालं. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आशा भोसले यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एकिकडे आशा भोसले यांच्या निधनानं सगळीकडे शोककळा पसरली आहे. तर अशातच आता दुसरीकडे आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचे अपघातात निधन झाले आहे. त्यामुळे सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा – आशा भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार; राज्यभरात शोककळा
केजीएफ फेम अभिनेता हरीश याचा भीषण अपघातात मृत्यू
दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील केजीएफ (KGF) फेम अभिनेता हरीश (Harish) यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. हरीशने वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेमुळे कन्नड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. तसेच हरीशच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता हरीशचा अपघात हा कर्नाटकमधील कोडागु जिल्ह्यातील कुशालनगर तालुक्यात घडला आहे. हरीश हा आपलं काम संपवून रात्रीच्या वेळी कुशालनगरहून होसाकोटे येथील आपल्या घरी परतत होता. यादरम्यान एक वनक्षेत्राजवळ त्याच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टँकरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की हरीशचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात हरीशच्या कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी हरीशचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. हा अपघात नेमका कसा घडला? याबाबतची चौकशी पोलीस करत आहेत.
दरम्यान, हरीश हा कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच हरीश हा त्याच्या खलनायच्या भूमिकांसाठी चांगलाच प्रसिद्ध होता. त्यांने आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच सुपरहीट ‘केजीएफ’ चित्रपटातही त्याने दमदार अशी भूमिका साकारत मोठी प्रसिद्धी मिळवली होती. मात्र, हरीशच्या अकाली निधनानं आता त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.






