Pappu Yadav Attack : बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर नवी दिल्लीतील निवासस्थानी भर पत्रकार परिषदेत हल्ला झाला, यानंतर पप्पू यादव यांनी सांगितलं कि हा त्यांना मारण्याचा कट होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं, सुरक्षा यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कसा हल्ला झाला ? हल्ला करणारा कोण होता ? कुठल्या पक्षाचा होता ? खरच हा खासदार पप्पू यादव यांना मारण्याचा कट होता का ? काय झाली घटना सविस्तर जाणून घेऊया….
दिल्लीतील पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
खासदार पप्पू यादव यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी माध्यमांची पत्रकार परिषद सुरू होती. पप्पू यादव राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधत होते. तिथे अनेक पत्रकार, पप्पू यादव यांच्या समर्थकांची. याच गर्दीचा फायदा घेत दोन तरुण पत्रकार परिषदेच्या आवारात घुसले. पप्पू यादव हे मिडीयाला प्रतिक्रिया देत असतांनाच अचानक त्यातील एका तरुणानं त्यांच्या दिशेने शूज फेकून मारला ( Pappu Yadav Attack ). अचानक झालेल्या या प्रकारामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि पत्रकार परिषदेत गोंधळ निर्माण झाला. शूज फेकल्यानंतर त्याने खिशातून एक चाकू काढला आणि पप्पू यादव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
त्याच वेळी तिथे उपस्थित असलेले त्यांचे सुरक्षा रक्षक, समर्थक आणि वकिलांनी तात्काळ मध्यस्थी केली. त्यांनी हल्लेखोराला जागेवरच कडक सुरक्षा वेढ्यात घेतले आणि त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. या झटापटीत पप्पू यादव यांच्या एका समर्थकाच्या बोटाला चाकू लागून किरकोळ दुखापत झाली ( Knife Attack ). संतप्त झालेल्या समर्थकांनी हल्लेखोराला तिथेच चांगलाच चोप दिला आणि त्यानंतर तातडीने दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण घटनेची दृश्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बेकायदा धर्मांतरावर कडक कारवाई, जाणून
आरोपी कोण आहे? पोलिसांच्या तपासात काय समोर आलं? ( Pappu Yadav Attack )
दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुख्य आरोपीचे नाव सुमित सहपानी आहे. हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचा रहिवासी आहे. सध्या तो गाझियाबाद परिसरात राहून काहीतरी छोटे-मोठे काम करत असल्याचे तपासात समोर आले. दिल्ली पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार, सुमित सहपानी याचा कोणताही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड आढळून आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणात त्याच्या एका सहकाऱ्यालाही ताब्यात घेतले आहे, हा दुसरा संशयित पप्पू यादव यांच्या निवासस्थानाबाहेर एका क्रेटा गाडीमध्ये थांबला होता. बुलंदशहरसारख्या ठिकाणाहून दिल्लीत खासदाराच्या घरात घुसून एवढे धाडस करण्यामागे त्याचा नेमका काय हेतू होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
आरोपी सुमितने पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दिलेल्या जबानीनुसार, त्याने हा हल्ला वैयक्तिक वैमनस्यातून किंवा पैशांसाठी केलेला नाही. संसदेच्या चालू अधिवेशनादरम्यान विरोधकांनी राम मंदिर आणि मंदिरातील दानासंदर्भात एक आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान खासदार पप्पू यादव यांनी साधूचा वेश परिधान केला होता आणि मंदिर घोटाळ्याच्या निषेधार्थ एक प्रतिकात्मक सादरीकरण केले होते. आरोपी सुमितच्या म्हणण्यानुसार, पप्पू यादव यांच्या या कृतीमुळे हिंदू धर्म, साधू-संत आणि सनातन धर्माचा मोठा अपमान झाला असून त्याच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या होत्या. याच धार्मिक रागाच्या भरात आणि भावनेच्या आहारी जाऊन त्याने पप्पू यादव यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा कट रचला होता….
पप्पू यादवांनी ‘मारण्याचा कट’ असल्याचा केला गंभीर आरोप ( Pappu Yadav Attack )
Bihar MP Pappu Yadav : या घटनेनंतर खासदार पप्पू यादव यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मला संपवण्याचा हा मोठा कट होता, असा दावा त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आणि काही संघटनांकडून मला मारण्यासाठी आणि जिवंत जाळण्यासाठी तब्बल ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, अशी माहितीही पप्पू यादव यांनी दिली. अशा जाहीर धमक्या येत असतानाही दिल्ली पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे. खासदाराच्या निवासस्थानी अशा संवेदनशील वेळी केवळ तीन ते चार पोलीस कर्मचारी तैनात असणे, ही पोलिसांची मोठी चूक आहे आणि यामध्ये सत्तेत असलेल्यांचा काहीतरी राजकीय हस्तक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा थेट तर्क वकिलांनी मांडला आहे.
दुसऱ्या बाजूला, या प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. पप्पू यादव हे बिहारमधील एक अत्यंत वजनदार आणि दबदबा असलेले नेते मानले जातात. त्यांच्या घराभोवती नेहमीच शेकडो समर्थकांचा गराडा असतो. अशा सुरक्षित आणि गर्दीच्या ठिकाणी एक तरुण चाकू घेऊन घुसतात आणि एका खासदारावर हल्ला करण्याचे धाडस करतात, ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. त्यांना तिथ पकडल जाईल आणि गुन्हा दाखल होऊ शकतो याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी हे पाऊल उचललं. त्यामुळे हा खरोखरच त्यांच्या हत्येचा सुनियोजित कट होता की पप्पू यादव यांनी संसदेत केलेल्या आंदोलनामुळे नाराज झालेल्या एका कट्टरपंथी तरुणाने प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेले हे कृत्य होते, या दोन्ही बाजूंनी पोलीस तपास करत आहेत.
हल्ल्यामागील सत्य तपासातून स्पष्ट होणार
जर हा हत्येचा कट असता, तर हल्लेखोराने अशा गर्दीच्या आणि कॅमेरे सुरू असलेल्या ठिकाणी एका चाकूच्या सहाय्याने हल्ला केला नसता. परंतु, दुसऱ्या बाजूने विचार केला तर, धार्मिक भावना भडकावून एखाद्या सामान्य तरुणाचा मोहरा म्हणून वापर करून अशा पद्धतीचे हल्ले घडवून आणले जाऊ शकतात, हेही नाकारता येत नाही. या हल्ल्यामुळे आता राम मंदिर आंदोलनावरून सुरू असलेल्या वादाला एक वेगळेच राजकीय वळण मिळाले आहे.
दिल्ली पोलीस सध्या आरोपी सुमित आणि त्याच्या साथीदाराची कसून चौकशी करताहेत, त्यांचा मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स आणि ते गाझियाबादमध्ये कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती गोळा करत आहेत. जोपर्यंत पोलिसांचा अंतिम तपास अहवाल समोर येत नाही, तोपर्यंत याला धार्मिक रागातून झालेला हल्ला म्हणनं किंवा यामागे कोणताही मोठा राजकीय कट असणे, या दोन्ही गोष्टी फक्त तर्क ठरतील. सध्या दिल्ली पोलिसांनी खासदारांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली असून या प्रकरणातील मूळ सूत्रधाराचा शोध घेण्याचे आश्वासन दिले आहे.
FAQ
प्र1. पप्पू यादवांवर हल्ला कुठे झाला?
दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान हल्ल्याचा प्रयत्न झाला.
प्र2. हल्लेखोराने कोणते शस्त्र वापरले?
हल्लेखोराने प्रथम शूज फेकला आणि त्यानंतर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
प्र3. आरोपी कोण आहे?
प्राथमिक माहितीनुसार आरोपीचे नाव सुमित सहपानी असून तो उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचा रहिवासी आहे.
प्र4. पप्पू यादवांनी काय आरोप केला?
पप्पू यादव यांनी हा त्यांना मारण्याचा सुनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
प्र5. या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?
दिल्ली पोलीस आरोपी आणि त्याच्या साथीदाराची चौकशी करत असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.









