Death Threat To Prasad Lad | भाजप (BJP) नेते आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रसाद लाड हे काल (21 मे) रात्रीपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मुक्कामी आहेत. तसेच ते आज मनोज जरांगेंची (Manoj Jarange) भेट घेणार आहेत. मात्र, जरांगेंची भेट घेण्यापूर्वी प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एक फोन आल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – बाबो…! इराणमध्ये नागरिकांना उघडपणे दिल्या जात आहे AK-47, बंदुका देण्यामागे नेमकं कारण काय?
प्रसाद लाड यांना नेमकी काय धमकी देण्यात आली?
प्रसाद लाड हे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असून काल रात्री त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांना रात्री दोन ते तीन धमकीचे फोन आले होते. गाडीवर हल्ला करू, हॉटेलमध्ये घुसून मारू अशा धमक्या प्रसाद लाड यांना देण्यात आल्या. तर धमकीचे फोन आल्यानंतर लाड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
प्रसाद लाड यांना धमकी आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर त्यांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. गणेश उगले आणि योगेश शितोळे पाटील अशी आरोपींची नावे असून या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये कडक बंदोबस्त ठेवला आहे.
पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर प्रसाद लाड यांनी त्यांना आलेल्या धमकी प्रकरणावर भाष्य केलं. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, पोलिसांनी धमकी देणाऱ्या दोन तरूणांना अटक केली आहे. पण मला ज्या तरूणांनी धमकी दिली आहे त्या तरूणांना माझ्याबाबतीत काही शंका असतील तर त्यांच्या शंकांच निरसन आम्ही करू. तसेच आम्ही पोलिसांना त्या तरूणांविरोधात कोणतीही कडक कारवाई करू देणार नाहीये, असं लाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज प्रसाद लाड हे मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. यासाठी आज सकाळीचे ते अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. ते थोड्या वेळात जरांगेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे सध्या जरांगे आणि लाड यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












