Miriya bund project update: तब्बल पाच वर्षे खडकात अडकून असलेले बसरा जहाज आता भंगारात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे जहाज रीलस्टार नावाने देखील प्रसिद्ध होते. परंतू आता हे जहाज भंगारात देण्याची कारवाई सुरु आहे.
रत्नागिरीत सततच्या लाटांच्या माऱ्यामुळे 2 जून रोजी या जहाजाचे दोन तुकडे झाल्याचे निदर्शनास आले होते. आता या जहाजाचे कटिंग करण्यात येणार असून त्यासंदर्भात प्रक्रिया सुरु आहे. या जहाजाला या मार्गावरून हटवण्यात येणार असल्याने मिऱ्या किनाऱ्यावर प्रतीक्षेत असलेल्या महत्त्वाच्या बंधारा प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्यामुळे ३ जून २०२० रोजी हे जहाज भरकटले आणि मिऱ्या किनाऱ्यावरील खडकात अडकले होते. या जहाजाला काढण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. सुरुवातीला सुमारे ३५ कोटी रुपये किंमत असलेले हे जहाज खाऱ्या पाण्याचा सततचा मारा आणि दुर्लक्षामुळे सडले. त्यामुळे आता ते केवळ दोन कोटी रुपयांमध्ये भंगारात काढले जात आहे.
हे ही वाचा : “आणीबाणीमुळं देशाला बेड्या ठोकण्यात आल्या…”; वंदे मातरमवरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरीटाइम बोर्डाची कन्सल्टंट म्हणून हे जहाज बाहेर काढण्याचे काम करत आहे. याबाबत दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून, त्यांनी ४० लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर हे जहाज अधिकृतपणे भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या जहाजाचे मोठे तुकडे झाल्यामुळे आता ते कटिंग करून काढले जात आहे. जहाज अडकल्यामुळे रखडलेल्या मिऱ्या किनाऱ्यावरील अनेक वर्षांपासूनच्या बंधारा प्रकल्पाला गती मिळणार आहे.












