Checkpoint Illegal Extortion Exposed : महाराष्ट्र–छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील देवरी चेक पोस्ट हा सध्या लुटीचा अड्डा बनल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रक चालकांकडून खुले आम अवैध वसुली केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी थेट चेक पोस्टवर धडक देत आरटीओचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे.
हेही वाचा – दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या घराबाहेर गोळीबार; जुहू परिसरात खळबळ
गोंदिया जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 हा महाराष्ट्र-छत्तीसगड राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. याच महामार्गावरील देवरी सीमा तपासणी नाका सध्या ट्रक चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. छत्तीसगडमधून येणारे तसेच महाराष्ट्रातून जाणाऱ्या ट्रक चालकांकडून दररोज दोनशे ते एक हजार रुपये अशी बेकायदेशीर वसुली या ठिकाणी केली जात जात आहे. दररोज हजारो ट्रक या मार्गावरून जात असल्याने लाखोंची अवैध वसुली होत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे काही ट्रक चालकांना कार्ड देण्यात आले असून ज्यांच्याकडे हे कार्ड आहे त्यांना अडवले जात नाही. मात्र, कार्ड नसलेल्या ट्रक चालकांकडून सक्तीने पैसे घेतले जातात हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. ट्रक चालक सांगतात “साहेब, पैसे दिले नाहीत तर कुठलाही गुन्हा लावून दंड लावतात कधी कधी मारहाणही होते नाईलाज असतो ट्रक उभा राहिला तर नुकसान आमचंच म्हणून पैसे द्यावे लागतात. खासदार यांच्या धडक भेटीनंतर आरटीओचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
डायरेक्ट पैसे घेण्याची हिंमत अधिकारी करत असतील तर त्यांच्या मागे मोठा राजकीय वरदहस्त असल्याचा संशय खासदारांनी व्यक्त केला आहे. “हा मुद्दा मी लोकसभेत मांडणार आहे. या प्रकरणाची CBI चौकशी झाली पाहिजे जर असे लुटीचे अड्डे बंद झाले नाहीत तर तीव्र आंदोलन केलं जाईल.” अशी माहिती खासदार प्रशांत पडोळे यांनी दिली आहे.
आधीच वाढती महागाई डिझेलचे दर आणि टोलमुळे त्रस्त असलेल्या ट्रक चालकांवर अशा अवैध वसुलीचा अतिरिक्त भार पडत आहे देवरी चेक पोस्टवरील या कथित लुटमारीवर प्रशासन काय कारवाई करणार ? की हा प्रकार असाच सुरू राहणार ? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.












