Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • चंद्रपूरात डायमंड ज्युबली कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये गोंधळ; ११ वाजेच्या परीक्षेला ११.०५ वाजेपर्यंत विद्यार्थी बाहेरच
ताज्या बातम्या

चंद्रपूरात डायमंड ज्युबली कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये गोंधळ; ११ वाजेच्या परीक्षेला ११.०५ वाजेपर्यंत विद्यार्थी बाहेरच

Chandrapur School Exam Chaos

Confusion in 12th exam in Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा शहरातील एकमेव बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या डायमंड ज्युबली कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान गंभीर अनागोंदी, गैरव्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र स्पष्ट झालं. सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या पहिल्या परीक्षेसाठी नियमानुसार विद्यार्थ्यांना किमान १०.४५ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात प्रवेश देणे अपेक्षित असताना, तब्बल ११.०५ वाजेपर्यंत शेकडो विद्यार्थी केंद्राबाहेरच थांबून असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

हेही वाचा – विरार उड्डाणपुलावरील गर्डरला टेम्पोची धडक; गर्डर कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी

परीक्षेसारख्या अत्यंत वेळबद्ध आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित प्रक्रियेत असा निष्काळजीपणा विद्यार्थ्यांच्या मानसिक संतुलनावर थेट परिणाम करणारा ठरला. प्रवेश प्रक्रियेतील विलंब, वर्गखोल्यांची योग्य तयारी नसणे, आसन व्यवस्थेतील गोंधळ आणि प्रश्नपत्रिका वाटपात उशीर यामुळे परीक्षेच्या ऐन क्षणी विद्यार्थ्यांना तीव्र तणावाखाली सामोरे जावे लागले. या शाळेचे बांधकाम अद्याप अपूर्ण असून परिसरात सुरू असलेले काम स्पष्टपणे दिसून येते. अशा स्थितीत परीक्षा केंद्र मंजूर करणे हे शिक्षण मंडळाच्या नियमांचे थेट उल्लंघन असल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांना गैरसोयीच्या अवस्थेत परीक्षा द्यावी लागली

विद्यार्थ्यांसाठी पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना गैरसोयीच्या अवस्थेत परीक्षा द्यावी लागली. शाळेला संरक्षक भिंत नसल्यामुळे बाहेरील परिसर पूर्णतः असुरक्षित आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे काही परीक्षा कक्ष पहिल्या मजल्यावर असून तेथे जाण्यासाठी सुरक्षित व नियमानुसार जिन्याची व्यवस्था नाही. अपघात घडल्यास जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. परीक्षा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना दीर्घकाळ बाहेर उभे ठेवणे आणि वेळेचे कोणतेही नियोजन नसणे, हे शिक्षण मंडळाच्या प्रशासनिक अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

परीक्षा केंद्राला केवळ कागदोपत्री मंजुरी देण्यात आली

परीक्षा केंद्र मंजुरीपूर्वी भौतिक सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती का, की केवळ कागदोपत्री मंजुरी देण्यात आली, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधित व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी. तसेच त्वरित सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात किंवा पर्यायी, सुरक्षित परीक्षा केंद्र जाहीर करावे, अशी ठाम मागणी पालक, विद्यार्थी व सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी, वेळेशी आणि भविष्यासोबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts