Female semen sales racket : बदलापूर येथे एका महिलेकडून घरातूनच बेकायदेशीररीत्या गर्भाशयातील स्त्री बीज (ओव्ह्युलेशन) वाढविण्यासाठी लागणारी इंजेक्शन्स देऊन महिलांचे अंडे काढून विक्री करण्याचा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा – इंदौर हत्या प्रकरण : “काय कराल जाणून?” हैवान आरोपीच्या चेहऱ्यावर विकृत हास्य..
मिळालेल्या माहितीनुसार, सौ.सुलक्षणा जयवंत गाडेकर (वय ४४, रा. जुवेली गाव, बदलापूर) हिने तिच्या घरामध्ये ओव्ह्युलेशन वाढविण्यासाठी लागणारी इंजेक्शन्स बेकायदेशीररीत्या साठवून ठेवली होती. गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून डॉक्टरांचा सल्ला न घेता सोनोग्राफी करून त्यांना संबंधित इंजेक्शन्स देण्यात येत होती. त्यानंतर गर्भाशयातील स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF/ART सेंटरमध्ये पाठवून तेथील डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये अंडी काढून त्यांची विक्री केल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये गर्भधारणेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफी करतानाचे छायाचित्रे, काही महिलांच्या खोट्या नावाने तयार केलेली सत्यप्रतिज्ञापत्रे, बनावट कागदपत्रे, विविध महिलांचे फोटो तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती आढळून आली आहे.
या प्रकरणी बदलापूर उपजिल्हा रुग्णालय येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी सोनोग्राफी सेंटर, IVF/ART सेंटर चालक, इंजेक्शन पुरवठादार आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व्यक्तींशी संगनमत करून महिलांकडून वारंवार डोनरचे काम करून घेत शारीरिक शोषण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुलक्षणा गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार (वय २९, रा. उल्हासनगर) आणि मंजुषा वानखडे (वय ४६, रा. उल्हासनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे बदलापूर परिसरात सुरू असलेल्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या रॅकेटचा बदलापूर पूर्व पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.












