Pakistan-Afghanistan War | सध्या पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) जोरदार युद्ध पेटले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अनेक शहरांवर एअर स्ट्राईक (Air Strike) केले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या माहिती प्रसारण मंत्रालयानं अफगाणिस्तानवर हल्ला केल्याची माहिती दिली आहे. तसेच सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये (Pakistan-Afghanistan war) जोरदार तणावाचे वातावरण दिसत आहे.
पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले कुठे केले?
पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अनेक शहरांना टार्गेट केले आहे. यामध्ये काबूल (Kabul), पक्तिया (Paktia) आणि कंधार (Kandhar) येथील मुख्य अफगाण तालिबानी लष्करी तळांना लक्ष्य करून पाकिस्तानने हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात कंधारमधील एक कॉर्प्स मुख्यालय आणि एक ब्रिगेड मुख्यालय उद्ध्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे काबूलमधील दोन ब्रिगेड मुख्यालये उद्ध्वस्त झाली आहेत.तसेच पक्तिया येथील एक कॉर्प्स मुख्यालय देखील उडवण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या सरकारी वृत्त संस्थांकडून मिळाली आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी दिला थेट इशारा
या हल्ल्याबाबत पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी म्हणाले की, आम्ही कुणालाही सोडणार नाही, जे लोक आमच्या शांततेला कमकुवत समजतात त्यांना आम्ही सडेतोड उत्तर देऊ. पाकिस्तान प्रदेशाच्या एकतेशी आणि शांततेशी तडजोड करणार नाही. आमचे सैन्य जोरदारपणे प्रत्युत्तर देईल, असा इशारा आसिफ अली जरदारी यांनी दिला आहे.
दरम्यान, गेल्या रविवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले होते. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानवर सीमापार हल्ले केले होते. या हल्ल्यात पाकिस्तानचे 55 सैनिक मारले गेले असून 19 पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर अफगाणिस्तानने केलेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा काही तासांमध्येच हवाई हल्ले केले.












