Adulterated milk : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खर्दे गावातील एका महिलेने विकत घेतलेले दूध गरम केल्यानंतर ते रबरसारख्या गोळ्यांमध्ये बदलल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
हेही – महिला दिनानिमित्त आई, बहिण, मैत्रिणीसोबत फिरायचंय? मग कर्नाटकातील ‘या’ खास ठिकाणांना भेट द्या!
शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूध विक्रेत्याकडून अर्धा लिटर दूध खरेदी केले होते. मात्र हे दूध घरात आणून उकळल्यानंतर त्यामध्ये विचित्र बदल झाल्याचे त्यांना दिसून आले. दूध उकळल्यानंतर ते संपूर्णपणे गाठींमध्ये बदलले आणि त्या गाठी हाताने तोडल्यावर त्या रबरसारख्या असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार पाहून आशाबाई बोरसे या चांगल्याच हैराण झाल्या.
त्या अनेक दिवसांपासून त्याच दूध विक्रेत्याकडून दूध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने दुधाच्या शुद्धतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, तीन ते चार महिन्यांपूर्वीही शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा प्रकार समोर आला होता. त्या वेळीही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र त्या प्रकरणात प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
भेसळयुक्त दूध नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंधित दुधाचे नमुने तपासावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. शिरपूर तालुक्यात वारंवार समोर येणाऱ्या भेसळयुक्त दुधाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.











