Stock Market : शेअर बाजारात आज बाजार उघडताच ‘ब्लड बाथ’ पाहायला मिळाली, एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल ११ लाख कोटी स्वाहा झाले आहेत, कारण सेन्सेक्स १७०० अंकांनी कोसळला आहे. भारतीय शेअर बाजारासाठी आजचा सोमवार ‘ब्लॅक मंडे’ ठरला आहे. जागतिक स्तरावर वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे दलाल स्ट्रीटवर आज गडगडाट पाहायला मिळाला. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अवघ्या काही तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे तब्बल 11 लाख कोटी बुडाल्यानं खळबळ माजलीय.
हेही वाचा – सराफ बाजारात मोठी उलथापालथ, सोनं 1,748 रूपयांनी घसरलं, तर चांदी 8,350 रूपयांनी आपटली
शेअर्समध्येही ५ ते ७ टक्क्यांची मोठी घसरण
आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ १,४०० अंकांनी कोसळला आणि काही वेळातच ही घसरण १,७५० अंकांपर्यंत पोहोचली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ देखील ४५० हून अधिक अंकांनी घसरून २२,५५० च्या पातळीवर आला. बाजारातील या पडझडीमुळे स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्येही ५ ते ७ टक्क्यांची मोठी घसरण पाहायला मिळाली.
जागतिक बाजारपेठा हादरल्या
गेल्या ४८ तासांत मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील थेट संघर्ष सुरू झाल्याच्या वृत्ताने जागतिक बाजारपेठा हादरल्या आहेत. हे युद्ध अधिक लांबण्याची आणि व्यापक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणने ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ बंद करण्याची धमकी दिल्याने कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती आज प्रति बॅरल ११५ डॉलरच्या पार गेल्या आहेत. भारतासाठी हे धोक्याचे लक्षण आहे, कारण भारत आपल्या गरजेच्या ८०% तेल आयात करतो.
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ३३ पैशांनी घसरला
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आज ३३ पैशांनी घसरून ९३.८६ च्या पातळीवर पोहोचला आहे. रुपयाच्या या कमकुवतपणामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेत आहेत. तेलाच्या किमती वाढल्यामुळे मालवाहतूक महाग होईल, ज्याचा थेट परिणाम अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होईल. यामुळे रिझर्व्ह बँक आगामी काळात व्याजदरात कपात करण्याची शक्यता धूसर झाली आहे.
बँकिंग, आयटी आणि मेटल सेक्टरला मोठा फटका
आजच्या घसरणीत बँकिंग, आयटी आणि मेटल सेक्टरला मोठा फटका बसला आहे, गुंतवणूकदारांच्या एकूण बाजार भांडवलात आज सकाळच्या सत्रात सुमारे १०.८ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत बाजारात अस्थिरता कायम राहील. “गुंतवणूकदारांनी अशा काळात घाईघाईने विक्री करू नये, तर चांगल्या दर्जाच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याची ही संधी असू शकते,” असा सल्ला काही विश्लेषकांनी दिला आहे. मात्र, नवीन गुंतवणूकदारांना सध्या Wait and Watch ही भूमिका घेण्यास सांगण्यात आले आहे.
निक्केई आणि हँग सेंग मध्येही ३ ते ४ टक्क्यांची घसरण
केवळ भारतच नव्हे, तर आशियातील इतर बाजार जसे की निक्केई आणि हँग सेंग मध्येही ३ ते ४ टक्क्यांची घसरण झाली आहे. अमेरिकन बाजारही शुक्रवारी घसरणीत बंद झाले होते, ज्याचा परिणाम आज भारतीय बाजारावर स्पष्टपणे दिसत आहे. सरकार किंवा रिझर्व्ह बँकेकडून काही सकारात्मक पावले उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत बाजारातील ही पडझड थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. सध्या तरी गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्था आहे.










