Terrorist Shabbir Ahmed Arrested | दिल्लीतून (Delhi) एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष पथकानं मोठी कारवाई केली आहे. लष्कर-ए-तोयबाचा (Laskar-e-taiba) दहशतवादी शब्बीर अहमदला (Terrorist Shabbir Ahmed) दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीच्या सीमेवरून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
दहशतवादी शब्बीर अहमदचा काय होता प्लॅन?
दहशतवादी शब्बीर अहमद हा लष्कर-ए-तोयबासाठी स्लीपर सेल म्हणून काम करत होता. शब्बीरने अनेक ठिकाणी देशविरोधी पोस्टर्स लावले होते. तसेच तो आयएसआयच्या (ISI) सांगण्यावरून एक नवीन मॉड्यूल तयार करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती समोर आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी शब्बीर अहमदला दिल्ली सीमेवर अटक केली आहे. शब्बीर हा बांगलादेशातून काम करत होता, तर भारतात हल्ला करण्याची योजना तो आखत होता, अशी धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं फेब्रुवारी 2026 मध्ये एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला होता. त्यावेळी पोलिसांनी पश्चिम बंगालमधील दोन जणांना आणि तामिळनाडूतील सहा जणांना अटक केली होती. या सर्व आरोपींमध्ये काही बांगलादेशी नागरिकही होते. ते सर्वजण आयएसआयच्या सांगण्यावरून मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होते. दिल्लीत बॉम्बस्फोट करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. तर ते मंदिरांनाही लक्ष्य करू शकतात, अशी माहिती समोर आली होती.
लष्कर-ए-तोयबा पुन्हा सक्रिय झाली आहे. 6 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील एका मशिदीत स्फोट झाला होता. याचाच बदला घेण्यासाठी लष्कर-ए-तोयबा भारतात दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत आहे. दहशतवादी दिल्लीतील लाल किल्ल्यावर हल्ला करू शकतात, अशी माहिती समोर आली होती. तर चांदनी चौकातील मंदिरालाही दहशतवाद्यांनी टार्गेट केल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, शब्बीर अहमदला दिल्ली पोलिसांनी 2007 साली काही शस्त्रांसह अटक केली होती. मात्र काही काळानंतर तो जामिनावर सुटला होता आणि बांगलादेशात पळून गेला होता. त्यानंतर आता त्याने पुन्हा एकदा दहशतवादी नेटवर्क सक्रिय करण्यास सुरूवात केली होती. लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याची त्याची योजना होती. त्यामुळे शब्बीर आएसआय आणि लष्कर-ए-तोयबाच्या मदतीने भारतात दहशतवादी नेटवर्क स्थापन करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि कारवाईमुळे या मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला आहे.












