• Home
  • महाराष्ट्र
  • कोर्टात बदलले सूर! न्यायाधीशांच्या प्रश्नावर अशोक खरातने जोडले हात, कोर्टात नेमकं काय घडलं
Top News

कोर्टात बदलले सूर! न्यायाधीशांच्या प्रश्नावर अशोक खरातने जोडले हात, कोर्टात नेमकं काय घडलं

ashok kharat

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) ढोंगी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. अशोक खरातने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच अनेक महिलांचे लैंगिक शोषणही केले आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अशोक खरातवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. आत्तापर्यंत त्याच्यावर 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर आज आणखी एक गुन्हा खरातवर दाखल करण्यात आला असून याबाबत नाशिक येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात हाय-प्रोफाईल सुनावणी पार पडली.

हेही वाचा – मोठा दिलासा! सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या आजचा भाव

कोर्टात नेमकं काय घडलं

आजच्या सुनावणीत विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी खरात विरोधातले अनेक गंभीर पुरावे सादर केले. आज नाशिक सत्र न्यायालयात न्यायमूर्ती बी.एन.इचपुराणिक यांच्यासमोर खरात प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान अशोक खरातला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

या सुनावणीला सुरूवात होताच विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी खरात विरोधातले काही महत्त्वाचे पुरावे सादर केले. त्यानंतर सरकारी वकिलांनी युक्तिवाद सुरू केला. ढोंगी खरातने एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेचे लैंगिक शोषण केले आहे. खरातने पीडित महिलेला सातव्या महिन्यात नजर लागते असं सांगत काही विधी करण्यास सांगितले. त्यावेळी विधी करण्याच्या बहाण्याने त्याने पीडित महिलेला गुंगीचे औषध दिले आणि तिचा लैंगिक छळ केला. एवढंच नाही तर खरातने हे कृत्य करताना समोर लॅपटॉप ठेवून सर्व रेकॉर्ड केल्याचा संशय पोलिसांना आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

तसेच सरकारी वकिलांनी सांगितलं की, खरात हा खूप हुशार आहे. तो आम्हाला तपासात कसलंही सहकार्य करत नाहीये, अशी माहिती वकिलांनी दिली. तसेच या सुनावणीत पोलिसांनी देखील महत्त्वाची माहिती दिली. खरात हा फक्त लैंगिक अत्याचारच करत नव्हता तर तो त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्याने बाजारात मिळणारे साधे चिंचोके पॉलिश करून ते मौल्यवान असल्याचे भासवून त्याच्या भक्तांना लाखो रूपयांना विकले आहेत. तसेच तो विधी करताना नकली साप, वाघाच्या कातड्यांचा वापर करत होता. या सर्व वस्तू तो कोठून आणत होता आणि ते बनावट खेड तो कोणाकडून बनवून घेत होता, याचा तपास आम्हाला करायचा आहे. त्यासाठी खरातला आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली.

न्यायाधीशांनी प्रश्न विचारताच खरात नेमकं काय म्हणाला?

दुसरीकडे खरातच्या वकिलांनी युक्तिवाद केली. ते म्हणाले की, आरोपीने त्याचे गुन्हे कबूल केले आहेत. आत्तापर्यंत तो पोलीस कोठडीतच होता. एका तक्रारदाराने खरातविरोधात खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. मात्र, या तक्रारदाराची तक्रार संशयास्पद आहे. कारण ही घटना नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या काळातील आहे. मग 21 मार्च 2026 रोजी तक्रारदाराने गुन्हा नोंदवला, त्यामुळे ही तक्रारच संशयास्पद आहे, असं आरोपी खरातच्या वकिलांनी म्हटलं आहे.

न्याय‍धीशांनी खरातच्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेत त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर न्यायाधीशांनी खरातला तुम्हाला काही बोलायचे आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर खरातने काहीही न बोलता फक्त हात जोडले. तर आता खरात पुढील पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts