Eknath Shinde On Operation Tiger | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कारण ठाकरे गटाचे (Thackeray Group) 8 खासदार हे एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत (Shivsena) जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या देरे या गावी असून तेथून ते ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) राबवणार असल्याचं म्हटलं जात. तर ठाकरे गटाच्या आठ खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – लग्न ठरलेल्या तरूणीला ऑफिसमध्ये बोलावलं अन्…, अशोक खरातचं आणखी एक धक्कादायक कृत्य उघड
ठाकरे गटाचे खासदार फुटणार?
ठाण्यात बुधवारी रात्री एक गुप्त बैठक झाली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे 8 खासदार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. यामध्ये ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, संजय जाधव, राजाराम वाकचौरे, राजाभाऊ वाजे, नागेश पाटील आष्टीकर आणि अरविंद सावंत हे खासदार या बैठकीला उपस्थीत असल्याचं म्हटलं जात होतं. तर या सर्व खासदारांसोबत एकनाथ शिंदेंनी संवाद साधला असून त्यांना केंद्रात महत्त्वाची पदे मिळतील, असं आश्वासन देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आता या ऑपरेशन टायगरबाबत आणि गुप्त बैठकीतबाबत एकनाथ शिंदेंनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमंक काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ऑपरेशन टायगरबाबतच्या चर्चांवर मौन सोडलं. ते म्हणाले की, गेल्या एक-दीड वर्षांपासून ठाकरे गटाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या सर्व बातम्या या खोडसळ, निराधार आणि गैरसमज निर्माण करणाऱ्या आहेत. आमची कोणतीही गुप्त बैठक झालेली नाहीये. ही केवळ एक अफवा असून या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाहीये. अशा प्रकारच्या सनसनाटी निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसार माध्यमांनी देऊ नये, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
दुसरीकडे या सर्व घडामोडींवर एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. “या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाहीये. ऑपरेशन टायगरबाबत गेल्या वर्षभरापासून अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. ही बातमी एक प्रकारची अफवा आहे. आमच्या पक्षाची कोणतीही गुप्त बैठक झालेली नाहीये. यामध्ये कोणतंही तथ्य नाहीये”, असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी या बातम्यांवर स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.












