Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांची, तरूणींची फसवणूक करत त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी अनेक महिला, तरूणी धैर्यानं सामोरे येत पोलीस स्थानकात खरातविरोधात तक्रार दाखल करताना दिसत आहेत. अशातच आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे. त्यामुळे आता एसआयटीच्या पथकानं पुन्हा एकदा खरातच्या कार्यालयावर छापा टाकला होता. यावेळी अनेक महत्त्वाचे आणि धक्कादायक पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत.
हेही वाचा – सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे ९३ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टीवर शोककळा
खरातच्या कार्यालयातून एसआयटीला सापडल्या धक्कादायक वस्तू
एसआयटीने पुन्हा एकदा खरातच्या कार्यालयाची झडती घेतली. यावेळी एसआयटीच्या पथकाला काही गंभीर पुरावे मिळाले आहेत. खरातने पीडित महिलांवर केलेल्या अत्याचाराचे काही पुरावे तपास पथकाच्या हाती लागले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी नवीन खुलासे होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या कार्यालयात विशेष तपास पथकाला कुजलेले पेढे, औषधाची बाटली, केबीनच्या आतील कडी, सेनेटायझरची बाटली या गोष्टी सापडल्या आहेत. तर या वस्तूंवर असलेले हाताचे ठसे हे खरातचेच असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे विशेष तपास पथकाला सापडलेल्या वस्तूंता वापर करून खरात पीडित महिलांना आपण सांगेल तसं करण्यास भाग पाडत होता आणि त्यांचे लैंगिक शोषण करत होता, असा खुलासा झाला आहे.
कॅनडा कॉर्नर येथील अशोक खरातच्या कार्यालयात विशेष तपास पथकानं पुन्हा एकदा तपासणी केली होती. यामध्ये अनेक पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत. तर खरातची पोलीस कोठडी सोमवारी (13 एप्रिल) संपत असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे आता एसआयटीला महत्त्वाचे पुरावे सापडल्यामुळे खरातच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत.
आत्तापर्यंत खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहेत. याप्रकरणी खरातवर एकूण 16 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अजूनही गुन्हे खरातवर दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, दुसरीकडे अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही फरार आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे पथके रवाना केली असून कल्पना खरातचा शोध घेतला जात आहे. कल्पना खरातही या प्रकरणात सामिल असल्याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे.











