PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज बहुप्रतिक्षित दिल्ली-डेहराडून द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. यामुळे आता दोन्ही शहरांमधील सहा तासांचा प्रवास फक्त अडीच तासांवर आला आहे. या द्रुतगती मार्गामुळे दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील लोकांना दिल्लीहून डेहराडूनला ये-जा करणे खूप सोपे होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेही उपस्थित होते.
हेही वाचा – “अशोक खरातचा एन्काऊंटर होणार, कारण…”, प्रणिती शिंदेंनी केला खळबळजनक दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले संबोधित
या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्योतिषी एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील रेषा वाचून त्याचे भविष्य सांगतात. पण जर मला याचा संबंध राष्ट्राच्या जीवनाशी जोडायचा झाला, तर राष्ट्राचे भवितव्य काय आहे? ते म्हणजे आपले रस्ते, आपले महामार्ग, आपले द्रुतगती मार्ग, आपले हवाई मार्ग, आपले रेल्वेमार्ग आणि आपले जलमार्ग. हेच आपल्या राष्ट्राचे भवितव्य आहे आणि गेल्या दशकापासून आपला देश एक विकसित भारत घडवण्यासाठी विकासाच्या अशा भवितव्य रेषा तयार करण्याकरिता कार्यरत आहे.
पुढे पंतप्रधान मोदींनी सांगितले की, या 12,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे हजारो कामगार, अभियंते आणि इतरांना रोजगार मिळाला आहे. यामुळे उत्तराखंडच्या पर्यटनाला मोठा फायदा होईल. हा द्रुतगती मार्ग उत्तराखंडमधील विविध पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रमुख मार्ग म्हणून काम करेल. तसेच दिल्ली-डेहराडून आर्थिक कॉरिडॉर प्रमुख पर्यटन आणि आर्थिक केंद्रांमधील संपर्क वाढवून, संपूर्ण प्रदेशात व्यापार आणि विकासासाठी नवीन संधी निर्माण करून प्रादेशिक आर्थिक विकासाला बळकटी देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
दरम्यान, दिल्ली-डेहराडून आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये अखंड आणि वेगवान कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी 10 इंटरचेंजेस, तीन रेल्वे ओव्हरब्रिज , चार मोठे पूल आणि 12 राइट-ऑफ-वे सुविधांच्या बांधकामाचा समावेश आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी, हा कॉरिडॉर प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज आहे. या प्रदेशाची पर्यावरणीय संवेदनशीलता, समृद्ध जैवविविधता आणि वन्यजीव लक्षात घेऊन अनेक वैशिष्ट्यांसह या कॉरिडॉरची रचना करण्यात आली आहे.












