• Home
  • देश
  • होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी गनबोट्सकडून टँकरवर गोळीबार; तणाव वाढला
ताज्या बातम्या

होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी गनबोट्सकडून टँकरवर गोळीबार; तणाव वाढला

अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझची सामुद्रधुनी टप्प्याटप्प्यानं पुन्हा सुरु करण्याबाबत करार; रिपोर्ट्समध्ये दावा

तेहरान US Iran Sanctions Row : होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तणाव पुन्हा वाढला आहे. ब्रिटिश लष्करानं शनिवारी पुष्टी केली की, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या दोन गनबोट्सनी या महत्त्वाच्या सागरी मार्गातून जाणाऱ्या एका टँकरवर गोळीबार केला. मात्र, यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स सेंटरनं सांगितलं की, टँकर आणि त्याचे कर्मचारी सुरक्षित आहेत. जहाजाची ओळख आणि गंतव्यस्थान जाहीर करण्यात आलेलं नाही. या घटनेपूर्वी, इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पुन्हा कडक निर्बंध लादल्याची घोषणा केली होती.

हेही वाचा : इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; व्हिडिओ जारी करत दिला मोठा इशारा, तणाव वाढणार?

अमेरिकेच्या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून उचललेलं पाऊल :

इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक रोखण्याचा घेतलेला निर्णय हा अमेरिकेनं इराणच्या जहाजवाहतूक आणि बंदरांवर लादलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून आहे. सात आठवड्यांच्या संघर्षादरम्यान इराणनं बहुतेक जहाजवाहतुकीवर निर्बंध घातले असून, केवळ अधिकृत जहाजांनाच येथून जाण्याची परवानगी दिली आहे. इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं म्हटलं आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आता कडक लष्करी देखरेख ठेवली जात आहे. जोपर्यंत अमेरिकेचे निर्बंध लागू राहतील, तोपर्यंत या मार्गावरील जहाजवाहतूक रोखली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आता जहाजे केवळ इराणच्या परवानगीनंच इथून जातील :

इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अझीझी म्हणाले की, परिस्थिती “पूर्वीच्या प्रणालीकडे” परत येत आहे, जिथं जहाजांना केवळ इराणी नौदलाच्या परवानगीनं आणि टोल भरल्यानंतरच जाण्याची परवानगी दिली जाईल. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एक दिवस आधी दावा केला होता की ही सामुद्रधुनी खुली राहील. लेबनॉनमध्ये इस्रायल आणि इराण-समर्थित हिजबुल्ला यांच्यात 10 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर हे विधान आलं.

जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत अमेरिकेचे निर्बंध कायम :

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदीचा विचार केला जाऊ शकतो असे संकेत दिले होते, परंतु नंतर त्यांनी सांगितलं की, जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत इराणच्या कृतींची पर्वा न करता अमेरिकेचे निर्बंध पूर्णपणे लागू राहतील. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एक आहे, जिथून जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे एक-पंचमांश तेल वाहून नेलं जातं. यामुळं, येथील परिस्थिती जागतिक ऊर्जा बाजारासाठी अत्यंत संवेदनशील मानली जातं.

21 जहाजं इराणला परत पाठवली :

केप्लर (Kpler) या डेटा फर्मनुसार, या मार्गावरील जहाजवाहतूक सध्या केवळ इराणनं मंजूर केलेल्या मार्गांपुरतीच मर्यादित आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून 21 जहाजं इराणला परत पाठवण्यात आली आहेत. सतत बदलणारी परिस्थिती आणि इराण-अमेरिका तणावामुळं या प्रदेशात अनिश्चितता वाढली आहे, ज्याचा परिणाम जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होण्याची भीती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts