US Israel Iran War : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला आता जवळपास दीड महिना पूर्ण झाला. या युद्धाचा परिणाम जगभरात जाणवत आहे. गॅस, इंधन तुटवडा झाल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यातील शिष्टमंडळाची पाकिस्तानमध्ये दुसऱ्या फेरीची चर्चा सध्या सुरु आहे.
हेही वाचा : “भारत शांततेच्या बाजूने…”, मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य
युद्धा अनेक नागरिकांचा मृत्यू :
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. “इराणच्या न्यायवैद्यक संघटनेच्या प्रमुखांनी सांगितलं की, युद्धातील मृतांचा आकडा आता किमान 3 हजार 375 इतका झाला आहे,” असं वृत्त’एपी’नं दिलं आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद :
युद्ध सुरु झाल्यापासून होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळं जगभरातील गॅस आणि तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दोन्ही राष्ट्रांचं नौदल सध्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आमनेसामने उभे आहेत. या दोन्ही देशांमधील शांतता चर्चेची दुसरी फेरी सोमवारी नियोजित आहे. यावेळी एखादा तोडगा निघतो, की पहिल्या फेरीप्रमाणेच ही चर्चाही कोणत्याही निष्कर्षाविना संपुष्टात येते, आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
भारतीय जहाजांवर इराणकडून गोळीबार :
दरम्यान इराणी नौदलाच्या दोन लढाऊ नौकांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या दोन जहाजांवर गोळीबार केला. इराणी प्रसारमाध्यमांनी नमूद केलं की, इराणी नौदलानं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून पश्चिमेकडे जाणाऱ्या दोन भारतीय जहाजांना माघारी फिरवलं. या जहाजांवर गोळीबार करण्यात आला. इराणनं अमेरिकेच्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करण्याची घोषणा केली. भारतीय जहाजावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात भारतानं इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फताअली यांच्याकडे तीव्र निषेध नोंदवला. त्या दोन जहाजांमध्ये 20 लाख बॅरल्स इतका तेलाचा साठा भरलेला होता.









