Sunetra Pawar Baramati Sabha : सध्या राज्यात बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनं (Baramati By-election) राजकीय वातावरण तापवलं आहे, काल रात्री मुख्यमंत्री फडणवीसांनी (CM Devendra Fadanvis) अक्षय कर्डिलेंसाठी बारामतीत सभा घेतली तर आज बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी (Sunetra Pawar) सभा पार पडतेय, मात्र या सभेला शरद पवारांच्या उपस्थितीवरून सस्पेन्स कायम आहे, सुनेत्रा पवारांसाठी या सभेला शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार का? याकडे सध्या राज्याचे डोळे लागले आहेत, तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील इतर नेते आणि पवार कुटुंबातील नेतेमंडळीतील कोण या सभेला उपस्थित राहणार? मुख्यमंत्र्यांसोबतच एका व्यासपीठावर शरद पवारांची राष्ट्रवादी दिसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा –
बारामतीच्या शारदा प्रांगणात ऐतिहासिक सभा
आज संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून, बारामतीच्या शारदा प्रांगणात आज सायंकाळी होणारी सांगता सभा ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र, या सभेत सर्वांचे लक्ष ज्यांच्या उपस्थितीकडे लागले होते, त्या शरद पवार यांच्याबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आजच्या या महत्त्वाच्या सांगता सभेला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत विविध चर्चा रंगत होत्या, मात्र आज त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने ते बारामतीला येऊ शकणार नाहीत. यामुळे सभेच्या मंचावर पवार साहेब नसले, तरी त्यांच्या अनुपस्थितीत पवार कुटुंबातील इतर सदस्य कशा प्रकारे किल्ला लढवतात, याकडे आता राजकीय विश्लेषणाचे लक्ष लागले आहे.
बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पवार कुटुंबात झालेली अभूतपूर्व एकी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळाला होता, परंतु अजित पवारांच्या निधनानंतर ही राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार म्हणून मैदानात आहेत आणि त्यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकवटले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत ते म्हणजे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार. रोहित पवार यांनी गेल्या आठवडाभरापासून बारामती मतदारसंघाचा कोपरा न कोपरा पिंजून काढला आहे. त्यांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारून ‘काकींसाठी जोमाने प्रचार केला आहे. आजच्या सांगता सभेत रोहित पवार हे मंचावर उपस्थित राहून आक्रमक भाषण करतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. रोहित पवार यांच्या उपस्थितीमुळे तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, अजित पवारांच्या पश्चात बारामतीची धुरा साभाळण्यासाठी ते सज्ज असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.
सुरुवातीपासूनच राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता
दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेबाबत सुरुवातीपासूनच राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. सुप्रिया सुळे यांनी या पोटनिवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत अत्यंत संयमी भूमिका घेतली आहे. त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, हे संकट कौटुंबिक आहे आणि अशा वेळी राजकारण गौण ठरते. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांना आजच्या सभेचे अधिकृत आमंत्रण देण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस हे या सभेचे मुख्य वक्ते असल्याने सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत एकाच मंचावर बसणार आहेत. जर सुप्रिया सुळे आजच्या सभेत उपस्थित राहिल्या, तर तो बारामतीच्या राजकारणातील एक मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. बारामतीकरांच्या मनात आजही ‘पवार’ या नावाप्रती प्रचंड आदर आणि निष्ठा आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी एकत्र येऊन सुनेत्रा पवार यांच्यासाठी साकडे घातल्यास त्याचा मोठा परिणाम मतदानावर होऊ शकतो.
शरद पवारांच्या पुढाकाराने सुनेत्रा पवारांचा मार्ग सुकर
या सभेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. महायुतीचे नेते म्हणून फडणवीस आज बारामतीत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. अशा वेळी देवेंद्र फडणवीस बारामतीकरांना काय आश्वासन देतात आणि महायुती सरकार बारामतीच्या विकासासाठी कशा प्रकारे कटिबद्ध आहे, हे सांगण्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. त्यांनी महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांशी चर्चा करून त्यांना उमेदवार न देण्यास प्रवृत्त केले होते, ज्यामुळे सुनेत्रा पवार यांचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे शरद पवार प्रत्यक्ष सभेत नसले, तरी त्यांची सावली या संपूर्ण निवडणुकीवर असल्याचे जाणवते.
बारामतीची नवी राजकीय दिशा स्पष्ट होणार
आजच्या या सांगता सभेसाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. शारदा प्रांगणावर होणाऱ्या या सभेला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही सभा केवळ एका जागेसाठीची पोटनिवडणूक नसून, ती पवार कुटुंबाच्या अस्तित्वाची आणि बारामतीच्या भविष्यातील नेतृत्वाची नांदी ठरणार आहे. रोहित पवार यांची वाढती सक्रियता आणि सुप्रिया सुळे यांचा संयम यातून बारामतीची नवी राजकीय दिशा स्पष्ट होणार आहे. अजित पवारांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा वहिनींचे मताधिक्य वाढवण्यासाठी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे कशा प्रकारे प्रयत्न करतात, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल. संध्याकाळच्या सभेत देवेंद्र फडणवीस काय बोलतात आणि सुप्रिया सुळे आपल्या भाषणात काय बोलतात, यावरच मतदानाचे भवितव्य अवलंबून आहे.












