Raghav Chadha Social Media Backlash: आम आदमी पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा राघव चड्ढा यांचा निर्णय तरुण वर्गात विशेषतः Gen Z मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण करत असल्याचे चित्र दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात अनफॉलो मोहिम सुरू झाल्याचेही समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप प्रवेशानंतर अवघ्या 24 तासांत राघव चड्ढा यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये मोठी घट झाली आहे. इंस्टाग्रामवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या सुमारे 10 लाखांनी कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
शुक्रवारी त्यांचे फॉलोअर्स सुमारे 1.46 कोटी इतके होते, जे शनिवारी 1.33 कोटींच्या आसपास आले असल्याची आकडेवारी समोर आली आहे. या घडामोडीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
हेही वाचा: राज्यसभेत आपला मोठा धक्का; राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदार भाजपमध्ये घेतला प्रवेश, पक्षाची ताकद घटली
राजकीय विश्लेषकांच्या मते, विशेषतः तरुण वर्गातून या पक्षांतर निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. काही युजर्सकडून त्यांना अनफॉलो करण्याचे आवाहन केले जात आहे आणि #UnfollowRaghavChadha हा हॅशटॅगही ट्रेन्ड होत आहे.
दरम्यान, चड्ढा यांनी यापूर्वी अनेक मुद्द्यांवर जनसामान्यांशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवला होता. पितृत्व रजा, गिग वर्कर्सचे प्रश्न, डिलिव्हरी सेक्टरमधील अटी आणि वाहतूक समस्यांवर त्यांनी भूमिका घेतली होती, ज्यामुळे त्यांची तरुणांमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली होती.
मात्र सध्याच्या राजकीय निर्णयामुळे त्यांच्या प्रतिमेला फटका बसल्याचे बोलले जात आहे. काही युजर्सनी त्यांच्या जुन्या पोस्ट्स डिलीट केल्याचा दावा केला असून सोशल मीडियावर याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडींनंतर राघव चड्ढा यांची सोशल मीडिया लोकप्रियता टिकून राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












