youth-sexual-harassment-video-case-15-girls : कोल्हापूर जिल्ह्यात अमरावती प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. हातकणंगले तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे आमिष दाखवून आणि नंतर अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून एका नराधमाने १५ हून अधिक तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हादरला असून ‘लव्ह जिहाद’च्या संशयामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुलाची शिरोली येथील २२ वर्षीय शाहीद समीर सनदी या तरुणाने हे क्रूर कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शाहीद हा स्वतः फार्मसीचे शिक्षण घेत असलेला सुशिक्षित तरुण आहे, मात्र त्याच्या कृत्याने माणुसकीला काळिमा फासला आहे. या प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे की, केवळ शिरोलीच नव्हे तर हुपरी, हातकणंगले आणि कोल्हापूर शहरातील अनेक तरुणी या नराधमाच्या शिकार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
फिरण्याच्या बहाण्याने लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार
या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा एका २० वर्षीय धाडसी पीडितेने कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, शाहीदने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथम तिच्याशी मैत्री केली. गोड बोलून आणि प्रेमाचे नाटक करून त्याने तिचा विश्वास संपादन केला. एकदा विश्वास बसल्यानंतर त्याने तिला फिरण्याच्या बहाण्याने विविध लॉजवर नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. मात्र, हे केवळ अत्याचारापुरते मर्यादित नव्हते; तर या नराधमाने तिथे तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो चोरून काढले.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी
त्यानंतर सुरू झाला तो मानसिक आणि शारीरिक छळाचा भयानक प्रकार, हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिची बदनामी करण्याची धमकी देऊन शाहीदने तिला वारंवार आपल्या वासनेचा शिकार बनवले. बदनामीच्या भीतीने ही तरुणी बराच काळ गप्प राहिली, मात्र जेव्हा छळ असहाय्य झाला, तेव्हा तिने अखेर पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. राजारामपुरी पोलिसांनी तक्रार मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि शाहीद समीर सनदी याला त्याच्या पुलाची शिरोली येथील घरातून ताब्यात घेतले.
सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क
पोलिसांनी जेव्हा शाहीदचा मोबाईल आणि सोशल मीडिया अकाउंट्स तपासले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. तपासादरम्यान असे दिसून आले की, शाहीदने अशाच प्रकारे १८ ते २२ वयोगटातील अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले होते. तो प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुणींना लक्ष्य करत असे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या माध्यमांतून तो तरुणींशी संपर्क वाढवायचा आणि नंतर त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा. तपासात १५ हून अधिक तरुणींची नावे समोर येत आहेत, ज्यांच्याशी शाहीदचे संबंध होते आणि ज्यांना त्याने ब्लॅकमेल केल्याचा संशय आहे.
नियोजनबद्धरीत्या तरुणींना टार्गेट, हिंदुत्त्ववादी संघटनांचा आरोप
या प्रकरणामुळे कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी याला ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचे म्हटले असून आरोपीला कठोरतम शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आरोपीने ज्या पद्धतीने नियोजनबद्धरीत्या तरुणींना टार्गेट केले, ते पाहता यामागे मोठी टोळी किंवा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. पुलाची शिरोली आणि परिसरात या घटनेनंतर प्रचंड तणाव असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न
शाहीद सनदी याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलीस त्याच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, इतर कोणत्या तरुणींना त्याने अशाच प्रकारे त्रास दिला आहे का, याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. शिरोली, हुपरी आणि हातकणंगले यांसारख्या ग्रामीण भागात शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणींनी आणि त्यांच्या पालकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.












