Breaking News :
Top News

फेऱ्या मारून भाऊ थकला, शेवटी बहिनीचा मृतदेह घेऊन बँकेत पोहोचला

brother carries sister dead body to bank

brother carries sister dead body to bank : ओडिशाच्या केओंझर जिल्ह्यातील पटना तालुक्यात असलेल्या दियानाली या दुर्गम गावात माणसातील निष्ठूरता समोर आली आहे. या गावात जितू मुंडा नावाचा ५० वर्षीय आदिवासी व्यक्ती आपली मोठी बहीण कालरा मुंडा हिच्यासोबत राहत होता. कालरा मुंडा यांचे वय ५६ वर्षे होते आणि त्यांच्या बँक खात्यात २०,००० रुपयांची तुटपुंजी रक्कम जमा होती. जितू आणि कालरा यांच्यासारख्या लोकांसाठी २० हजार रुपये ही मोठी रक्कम होती. जी त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी अत्यंत महत्त्वाची होती. मात्र, नियतीने घात केला आणि २६ जानेवारी २०२६ रोजी कालरा मुंडा यांचे निधन झाले. एका गरीब कुटुंबासाठी हा केवळ भावनिक धक्का नव्हता, तर आर्थिक संकटाची सुरुवातही होती.

हेही वाचा – यवतमाळमध्ये पाणीटंचाईचं भीषण वास्तव, फासेपारधी महिलांचा संताप

बहिणीच्या मृत्यूनंतर तिचे अंत्यविधी पार पडले. काही दिवसांनी घर चालवण्यासाठी पैशांची निकड भासू लागल्याने जितू मुंडा यांनी आपल्या बहिणीच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचा निर्णय घेतला. ते पटना तालुक्यातील ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालीपोसी शाखेत गेले. जितू हे निरक्षर आहेत, त्यांना बँकिंग व्यवहारातील तांत्रिक बाबी, अर्जांचे नमुने किंवा कायदेशीर गुंतागुंत याबद्दल शून्य माहिती होती. त्यांना वाटले की, बहीण गेल्यावर भाऊ म्हणून त्यांना ते पैसे सहज मिळतील. मात्र, जेव्हा ते बँकेत पोहोचले, तेव्हा त्यांना नियमांच्या अशा अडचणींचा सामना करावा लागला, ज्याला ओलांडणे त्यांच्यासाठी अशक्य झाले.

जोपर्यंत खातेदार स्वतः बँकेत येत नाही, तोपर्यंत पैसे नाही

बँकेतील कर्मचाऱ्यांनी जितू यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, जोपर्यंत खातेदार स्वतः बँकेत येत नाही, तोपर्यंत पैसे दिले जाणार नाहीत. जितू यांनी विनवणी केली, हात जोडले आणि वारंवार सांगितले की, माझी बहीण कालरा आता या जगात नाही, तिचा मृत्यू झाला आहे. तरीही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत निर्दयीपणाने आपले पालुपद सुरूच ठेवले. खातेदार जिवंत असो वा मृत, जोपर्यंत ती प्रत्यक्ष समोर येत नाही, तोपर्यंत अंगठा घेतल्याशिवाय किंवा सही घेतल्याशिवाय पैसे काढता येणार नाहीत, असा अजब पवित्रा बँक कर्मचाऱ्यांनी घेतला. एका निरक्षर माणसाला ‘मृत्यू दाखला’ ‘वारस नोंदणी’किंवा ‘कायदेशीर वारस दाखला’ या गोष्टींची काय माहिती असणार? बँकेच्या कर्मचाऱ्यांचे कर्तव्य होते की त्यांनी जितू यांना या प्रक्रियेबद्दल साध्या भाषेत मार्गदर्शन करावे. मात्र, मदतीचा हात देण्याऐवजी त्यांनी केवळ तांत्रिक अडवणूक केली.

बहिणीची पुरलेला सांगाडा बाहेर काढूनला थेट बँकेत पोहोचला

अनेक दिवस जितू मुंडा बँकेच्या चकरा मारत राहिले. गावापासून बँकेपर्यंतचा प्रवास, दिवसभराची भूक आणि पदरी पडणारी निराशा यामुळे जितू यांचा संयम सुटत चालला होता. प्रत्येक वेळी त्यांना त्याच प्रश्नाचा सामना करावा लागत होता, “बहीण कुठे आहे? तिला घेऊन या. अखेरीस, हताश झालेल्या जितू मुंडा यांच्या मनात एक टोकाचा विचार आला. ज्या व्यवस्थेला जिवंत माणसाच्या शब्दावर विश्वास नाही, तिला पुरावाच दाखवावा लागेल, असा निश्चय त्यांनी केला. सोमवारी पहाटे जितू यांनी आपल्या बहिणीची कबर उकरली आणि तिचा सांगाडा बाहेर काढला. एका कपड्यात तो सांगाडा गुंडाळून त्यांनी तो खांद्यावर घेतला आणि ते थेट बँकेत पोहोचले.

खातेदाराला बोलवणारा बँक कर्मचारी मृतदेह पाहून पळून गेला

जेव्हा जितू मुंडा सांगाडा घेऊन बँकेच्या आवारात शिरले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली. एक व्यक्ती आपल्या मृत बहिणीचे अवशेष घेऊन पैसे मागण्यासाठी उभा आहे, हे दृश्य पाहताना अनेकांच्या अंगावर काटा आला. बँकेत एकच गोंधळ उडाला. जो कर्मचारी आतापर्यंत खातेदाराला आणण्याचा आग्रह धरत होता, तोच आता भीतीपोटी लांब पळू लागला. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि काही वेळातच पटना पोलीस ठाण्याचे पोलीस तिथे दाखल झाले.

डिजिटायझेशनच्या युगात कागदपत्रांना माणसापेक्षा जास्त महत्त्व

ही घटना केवळ एका बँकेच्या कर्मचाऱ्याची चूक नाही, तर ती आपल्या संपूर्ण प्रशासकीय मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. आपण डिजिटायझेशनच्या युगात कागदपत्रांना माणसापेक्षा जास्त महत्त्व देऊ लागलो आहोत. गरीब, अशिक्षित आणि विशेषतः आदिवासी समुदायातील लोकांसाठी बँकिंग आणि सरकारी कामे आजही एखाद्या युद्धापेक्षा कमी नाहीत. नियमांचा हेतू व्यवस्था सुलभ करणे हा असायला हवा, पण इथे नियमच माणसाचा छळ करण्यासाठी वापरले जात असल्याचे दिसते. जर बँकेच्या व्यवस्थापकाने किंवा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे पाहिले असते, तर जितू मुंडा यांना आपल्या स्वतःच्या हाताने बहिणीची कबर उकरण्याची वेळ आली नसती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts