Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • थलपती विजय बनला तामिळनाडूचा ‘जननायक’; पहिल्याच निवडणुकीत TVK ला कसा मिळाला ब्लॉकबस्टर विजय? वाचा सविस्तर
Top News

थलपती विजय बनला तामिळनाडूचा ‘जननायक’; पहिल्याच निवडणुकीत TVK ला कसा मिळाला ब्लॉकबस्टर विजय? वाचा सविस्तर

थलपती विजय बनला तामिळनाडूचा 'जननायक'; पहिल्याच निवडणुकीत TVK ला कसा मिळाला ब्लॉकबस्टर विजय? वाचा सविस्तर

चेन्नई Tamil Nadu Election : तामिळनाडूमध्ये आजवर सुपरस्टार हे राजकारणाकडे वळण्याची एक परंपरा राहिली आहे. सुपरस्टार विजय थलपतीनंदेखील चित्रपटसृष्टी सोडून यंदा विधानसभा निवडणुकीत त्याच्या तमिलगा वेट्री कजगम (टीव्हीके) पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. अनपेक्षितपणे आज जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालात त्याच्या पक्षानं बहुमत विजय मिळवून सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं आगेकूच सुरू केली आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास लागले आहेत. यावेळी अभिनेता विजयचा पक्ष तामिळगा वेत्री कळघम (TVK) दमदार कामगिरीसह आघाडीवर आहे. त्याच्या पक्षाच्या प्रदर्शनानं तामिळनाडूच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ निर्माण केली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 234 विधानसभा जागांपैकी 106 जागांवर TVK आघाडीवर आहे आणि आता हेच निकाल राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पराभव; विजयच्या TVK चे

विजयच्या एंट्रीनं बदललं राजकारणाचं चित्र :

2026 ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. राज्याच्या निवडणूक इतिहासाचा विचार करता, 1977 पासून द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) हे तामिळनाडूतील दोन सर्वात मोठे राजकीय पक्ष राहिले आहेत. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये या दोन पक्षांमध्ये सत्तेसाठी संघर्ष झाला होता, परंतु यावेळी विजयच्या राजकारणातील प्रवेशानं संपूर्ण चित्रच पालटले आणि त्याचा परिणाम निकालांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

डीएमकेनं दिला आघाडीवर भर :

वर्षानुवर्षे तामिळनाडूवर केवळ डीएमके आणि एआयएडीएमकेचंच राज्य राहिलं आहे. गेल्या काही वर्षांपासून सत्ताधारी डीएमकेनं आपली आघाडी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. दरम्यान, 2016 मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर एआयएडीएमके पक्ष अंतर्गत कलहाशी झुंजत आहे. तर विजय टीव्हीके तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढण्याचं आश्वासन देताना आणि आवाज उठवताना दिसत आहे. यामुळं तामिळनाडूतील लोकांना टीव्हीके हे डीएमके आणि एआयएडीएमकेसाठी एक प्रबळ पर्याय म्हणून दिसू लागलं आहेत.

तामिळ चित्रपटसृष्टीत मोठा स्टार :

विजयनं आपली प्रतिष्ठा चित्रपटसृष्टीतून निर्माण केली आहे. तो तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक आहे, ज्याचे चित्रपट सहजपणे 100-200 कोटी रुपये कमावतात. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीच विजयनं चित्रपटांमध्ये काम करणं थांबवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. या निर्णयानं अनेकांना आश्चर्यचकित केलं असले तरी, तो राजकारणाबद्दल गंभीर आहे असा संदेशही लोकांच्या मोठ्या वर्गाला मिळाला. कारण त्याच्या आधीही कमल हासन, रजनीकांत आणि चिरंजीवी यांसारख्या मोठ्या स्टार्सनी स्वतःचे राजकीय पक्ष स्थापन केले होते. पण आज त्यांच्यापैकी कोणीही राजकारणात सक्रियपणे सहभागी नाही.

काँग्रेससोबतची युती डीएमकेसाठी तोट्याची ठरली? :

या निवडणुकीत डीएमकेनं काँग्रेससोबत युती करुन निवडणूक लढवली. डीएमकेनं 234 पैकी 164 जागांवर उमेदवार उभे केले होते. तर काँग्रेसनं 28 जागांवर आपले उमेदवार दिले होते, तर उर्वरित जागा इतर मित्रपक्षांना देण्यात आल्या. डीएमकेच्या या निर्णयामुळं युती मजबूत झाली असली तरी, त्यांनी जनतेला असा संदेशही दिला की ते एकट्यानं निवडणुका जिंकू शकत नाहीत. दरम्यान, विजयनं कोणत्याही मोठ्या पक्षाशी हातमिळवणी न करता आपल्या पहिल्या निवडणुकीत सर्व 234 जागा एकट्यानं लढवण्याची घोषणा करुन स्वतःला डीएमकेपेक्षा अधिक मजबूत म्हणून सादर करण्यात यश मिळवलं.

जाहिरनाम्यानं वेधलं लक्ष :

अभिनेता विजयच्या राजकारणातील प्रवेशानं तामिळनाडूच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक नवीन खळबळ निर्माण केली आहे. त्याच्या पक्षानं टीव्हीकेनं आपल्या पहिल्याच तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रभाव पाडला, त्याचा पक्ष 100 हून अधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेली सात प्रमुख निवडणूक आश्वासने, ज्यांचा थेट जनतेवर परिणाम झाला.

महिलांना केलं आकर्षित :

टीव्हीकेचं सर्वात मोठं आश्वासन ‘मधिप्पुमिगु मगलिर थिट्टम’ अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे होतं. यामध्ये 60 वर्षांपर्यंतच्या महिला कुटुंबप्रमुखांना दरमहा ₹2500 च्या अनुदानाचा समावेश होता. तसंच ‘अन्नपूर्णी सुपर सिक्स योजने’अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी सहा मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचं आश्वासन देण्यात आलं, जे घरगुती खर्च कमी करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल होतं. याव्यतिरिक्त, टीव्हीकेनं ‘अन्नन सीर थिट्टम’ दरम्यान बहिणी आणि मुलींच्या लग्नासाठी आठ ग्रॅम सोनं दान करण्याचे आश्वासन दिले. इतकंच नव्हे तर, रेशमी साडी दान योजनेनेही लक्ष वेधून घेतलं.

विद्यार्थी आणि तरुणांसाठी अनेक आश्वासनं :

शिक्षणावर लक्ष केंद्रित करुन, ‘कामराजार कलवी उरुधी थिट्टम’ योजनेअंतर्गत, इयत्ता 1 ते 12 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 15,000 रुपयांच्या अनुदानाची घोषणा करण्यात आली, जेणेकरुन कोणत्याही मुलाचे शिक्षण खराब आर्थिक परिस्थितीमुळं खंडित होणार नाही. ‘वेत्री पयनाम थिट्टम’ योजनेअंतर्गत महिलांसाठी सरकारी बसमधून मोफत प्रवासाचं आश्वासन देण्यात आले, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल. याशिवाय, तरुणांना आकर्षित करण्यासाठी, टीव्हीकेनं पदवीधरांसाठी प्रति महिना 4000 रुपये आणि डिप्लोमा धारकांसाठी प्रति महिना 2500 रुपयांची बेरोजगारी भत्ता योजना जाहीर केली.

शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा :

टीव्हीकेनं शेतकऱ्यांसाठीही एक मोठी घोषणा केली, ज्यात 5 एकरपर्यंत जमीन असलेल्या लहान शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले. इतकेच नाही, तर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी 50 टक्के कर्जमाफीचे आश्वासनही दिलं. या थेट लाभांमुळं आणि लोकप्रिय आश्वासनांमुळं टीव्हीकेचं दमदार पदार्पण झाले आहे आणि विजय हे तामिळनाडूच्या राजकारणातील एक गंभीर खेळाडू म्हणून प्रस्थापित झाले आहेत.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts