onion price crash farmers : शेतकरी.. बळीराजा..जगाचा पोशिंदा.. महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक राज्य म्हणून ओळखला जातो. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड, धुळे यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांचा कांदा पिकावर आपला उदरनिर्वाह अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात झालेली प्रचंड घसरण, वाढते उत्पादन खर्च, निर्यातीवरील निर्बंध, नैसर्गिक आपत्ती आणि साठवणुकीच्या अपुऱ्या सुविधा यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय…
कांद्याला कृषी उत्पन्न बाजार समितीत कुठे ५० पैसे, कुठे एक रुपया, कुठे दोन रुपये किलो असा दर मिळतोय.. भराई, हमाली-तोलाई, वाहतूक भाडं, मार्केट फी जाऊन शेतकऱ्यांना वर खिशातून पैसे भरावे लागतायत.. कांद्याने शेतकऱ्यांचं पुरतं पानिपत केलं असताना शहरांमध्ये मात्र ग्राहकांना २० ते २५ रुपये किलोने कांदा मिळत आहे…
हेही वाचा – जमीन वादांना आळा? जुलैपासून नवा कायदा, राज्य सरकारने केली मोठी घोषणा
नाशिकच्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी जितेंद्र साळुंखे यांच्या कांद्याला ५० पैसे किलो दर मिळाला. आंदोलन केल्यावर व्यापाऱ्याने अवघा दीड रुपयाचा दर दिला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी प्रकाश गलधर यांच्या कांद्याला १ रुपया किलो दर मिळाला. १,२०० किलो कांदा विकल्यावर हमाली, वाहतूक भाडे वजा केल्यावर त्यांना खिशातून १ रुपया भरावा लागला. सोलापूरमध्ये अंकुश गुंजाळ यांनी ७३ गोनी कांदा विकला व त्यांच्या हातात आले फक्त ४०० रुपये…
20 पोते कांदा विकला शेतकऱ्याच्या हातावर अवघे 519 रुपये उरले
बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील एका शेतकऱ्याने तब्बल 41 पोते कांदा सोलापूर मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला. परंतु त्यातील फक्त 20 पोते कांदा विकला गेला आणि सर्व खर्च, हमाली, तोलाई, दलाली, बाजार शुल्क, वाहतूक व इतर कपाती वजा जाता त्या शेतकऱ्याच्या हातावर अवघे 519 रुपये उरले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे उर्वरित 21 पोते कांदा विकलाच गेला नाही आणि तो कांदा आजही बाजारात तसाच पडून असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी संघटनेकडे पाठवली आहे. ही घटना फक्त एका शेतकऱ्याची नाही तर महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वेदनेचा आणि व्यवस्थेविरोधातील संतापाचा जिवंत पुरावा आहे.
कांद्याला अवघा 50 रुपये क्विंटल म्हणजे 50 पैसे किलो इतका दर
नाशिक जिल्ह्यातील सटाणा बाजार समितीत तर परिस्थिती आणखी भयावह झाली आहे. तेथे एका शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा 50 रुपये क्विंटल म्हणजे 50 पैसे किलो इतका अत्यंत कमी दर मिळाला. ज्या कांद्याला पिकवण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात, त्या कांद्याची किंमत आज पाण्यापेक्षाही कमी झाली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या संबंधित शेतकऱ्याने बाजार समितीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी संघटनेकडे दिली आहे. आज परिस्थिती अशी झाली आहे की शेतकरी आपल्या घामाचे, कष्टाचे आणि आशेचे पीक बाजारात घेऊन येतो. पण बाजारात त्याच्या मालाची अक्षरशः चेष्टा केली जाते. ही अवस्था कोणत्याही संवेदनशील समाजाला लाज वाटावी अशी आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत भाव वाढण्याची आशा
पावसापासून वाचलेल्या चांगल्या कांद्याला पुढच्या १५ दिवसांत चांगले भाव मिळण्याची अपेक्षा आहे. ८ ते १० दिवसांत निर्यातीत सुधारणा होऊन देशांतर्गत बाजारपेठेत भाव वाढण्याची आशा आहे…. सध्या राज्यात कांद्याची आवक वाढली आहे, तुलनेत मोठी मागणी नाही. काही ठिकाणी अवेळी पावसामुळे कांद्याची प्रतवारी खराब झाली आहे. मध्य प्रदेशातही पावसाचा कांद्याला फटका बसला आहे. प्रतवारी करताना व्यापाऱ्यांना १० ते १५ टक्के माल बाजूला काढावा लागतो. तापमान वाढल्याने कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे….
परदेशात माल पाठविणे मोठा धोका पत्करण्यासारखे
परदेशात कांद्याला सध्या मागणी नाही. कांदा पाणी सोडत असल्याने परदेशात माल पाठविणे मोठा धोका पत्करण्यासारखे आहे. तेथे कांदा पोहोचेपर्यंत खराब झाला तर पैसे मिळणार नाहीत. युद्धकाळात अनेक देशांमध्ये कांदा पोहोचण्यास उशीर झाला. त्यातून निर्यातदारांना फटका बसला. पुढच्या ८ ते १० दिवसांत निर्यातीची परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे…
कांदा उत्पादक शेतकरी कर्जात बुडाला आहे. अनेक शेतकरी बँका, पतसंस्था, खासगी सावकार यांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. घर चालवणे, मुलांचे शिक्षण, शेतीचा खर्च, औषधोपचार आणि दैनंदिन जीवन जगणेही कठीण झाले आहे.. आज महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे. शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना सरकार मात्र फक्त बैठका, समित्या आणि घोषणांमध्ये व्यस्त आहे. शेतकऱ्यांना आता आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष निर्णय हवे आहेत..
कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालाय….. सरकार लक्ष द्यायला तयार नाही.. शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी रोहित पवार मैदानात उतरणार आहेत.. 18 मे 2026 रोजी लासलगाव येथे ते उपस्थित राहणार आहेत. 19 तारखेच्या आत पाषाणहृदयी सरकारला पाझर फुटेल आणि सरकार या प्रश्नी लक्ष घालेल अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केलीय.. यानंतर तरी सरकार या प्रश्नावर काही तोडगा काढतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.












