Air India Flights | टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने (Air India) नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने आपल्या अनेक मार्गांवर महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जूनपासून पुढील तीन महिन्यांसाठी अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे कमी केली जाणार आहेत. तसेच काही मार्गांवरील सेवा पूर्णपणे स्थगित केली जाणार असल्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा – प्रतीक यादव यांच्या शवविच्छेदन अहवालात मोठा खुलासा; मृत्यूचं कारण समोर
एअर इंडियाने कोणत्या मार्गांवरील विमानसेवा केल्या स्थगित?
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने दिल्लीहून सिंगापूर, शिकागो, नेवार्क आणि शांघायसाठीच्या विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत. तसेच पॅरिस, टोरोंटो आणि सॅन फ्रान्सिस्को या प्रमुख शहरांसाठीच्या विमानसेवादेखील कमी करण्यात आल्या आहेत. एअर इंडियाच्या या निर्णयामागे जेट इंधनाच्या सतत वाढणाऱ्या किमती हे प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जात आहे.
एअर इंडियाने 100 विमानसेवा कमी केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना तिकीट मिळण्यास अडचणी येऊ शकतात आणि भाडेवाढीचा सामना करावा लागू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुमारे 99 डॉलर असलेल्या जेट इंधनाची सरासरी किंमत मे महिन्यात प्रति बॅरल 162 डॉलरवर पोहोचली आहे. त्यामुळे तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे एअर इंडियाने विमानसेवा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी म्हटलं आहे की, जर इंधनाच्या किमती वाढत राहिल्या तर विमान उड्डाणांमध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय तिकिटांचे दर वाढू शकतात आणि प्रवाशांचे पर्याय मर्यादित होऊ शकतात.








