Nitin Gadkari | काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील सर्व नागरिकांना काटकसर करण्याचे आवाहन केले होते. तसेच सरकारी खर्चात कपात करण्याचे देखील आवाहन केले होते. तर यापार्श्वभूमीवर आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाचे पालन करत नितीन गडकरींनी आपला ताफा कमी केला आहे.
हेही वाचा – केरळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार? अंतिम नावावर शिक्कामोर्तब, राजकीय हालचाली वाढल्या
नितीन गडकरींनी नेमका काय घेतला निर्णय?
नितीन गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरी हे संत ज्ञानेश्वर-तुकाराम पालखी मार्गाची बसने पाहणी करणार आहेत. त्यामुळे सध्या गडकरींनी घेतलेल्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी हे 14 आणि 15 मे रोजी महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची पाहणी करणार आहेत. यादरम्यान नितीन गडकरी यांच्यासोबत पाहणीसाठी वाहनांचा मोठा ताफा नसणार आहे. गडकरी आपल्या ताफ्याऐवजी पाहणीसाठी बसचा वापर करणार आहेत. याबाबत गडकरींनी पुणे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, माझ्या पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासह पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी एका बसची व्यवस्था करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 11 मे रोजी हैदराबादमध्ये पंतप्रधान मोदींची एक सभा झाली होती. या सभेत त्यांनी सरकारी खर्चात कपात करण्याचे, इंधनाची बचत करण्याचे आणि काटकसर करण्याचे आवाहन केले होते. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावाचा संदर्भ देत त्यांनी नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सरकारी विभागांनाही अनावश्यक खर्च कमी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्याची संख्या देखील कमी केली आहे.












