Ashadhi Wari 2026 | विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन निघणाऱ्या हजारो भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2026 Timetable) अखेर जाहीर करण्यात आले आहे. माऊलींच्या या पालखी सोहळ्याचे प्रस्थान कधी होणार, कोणत्या मार्गाने पालखी पुढे जाणार आणि कुठे-कुठे मुक्काम असणार याबाबतची सविस्तर माहिती आता स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आता सर्व वारकऱ्यांमध्ये पंढरीच्या दिशेने होणाऱ्या या भक्तिमय प्रवासाची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.
हेही वाचा – PM मोदींच्या आवाहनानंतर गडकरींचा मोठा निर्णय, बसने करणार पालखी मार्गाची पाहणी, ताफा केला कमी
माऊलींच्या पालखी सोहळ्याचा कुठे, कधी असणार मुक्काम? जाणून घ्या वेळापत्रक
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी (Ashadhi Wari) पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आता जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार, माऊलींची पालखी येत्या 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता विठुरायाच्या भेटीसाठी आळंदीहून प्रस्थान करणार आहे. तसेच 24 जुलै रोजी माऊलींची ही पालखी विठुरायाचा गजर करत पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. 17 दिवसांच्या या वारीमध्ये चार गोल आणि तीन उभी रिंगणे होणार आहेत.
पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकानुसार, माऊलींची पालखी 8 जुलैला आळंदीतून प्रस्थान होणार आहे. त्यानंतर 9 आणि 10 जुलै रोजी पालखीचा पुण्यात मुक्काम असणार आहे. नंतर 11 ते 12 जुलै रोजी पालखी सासवडमध्ये मुक्काम करेल. तिथून 13 जुलै रोजी जेजुरी आणि नंतर 14 जुलै रोजी वाल्हे येथे पालखी विसावेल. त्यानंतर 15 जुलै रोजी नीरा नदीत स्नान केल्यानंतर पालखी लोणंदकडे मार्गस्थ होणार आहे. तर 16 जुलै रोजी चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण होईल आणि तिथून तरडगाव येथे मुक्काम होणार आहे.
17 जुलै रोजी फलटण, 18 जुलै रोजी बरड आणि 19 जुलै रोजी नातेपुते या क्रमाने पालखी मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर 20 जुलै रोजी पुरंदवडे येथे पालखीचे पहिले गोल रिंगण होईल आणि ते झाल्यानंतर माळशिरसमध्ये मुक्काम केला जाणार आहे. नंतर 21 जुलैला खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडेल आणि वेळापूरमध्ये मुक्काम केला जाईल. 22 जुलैला ठाकुरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण होईल. नंतर टप्पा येथे ऐतिहासिक ‘बंधू भेट’ होईल आणि तिथून पालखी भंडीशेगावला मार्गस्थ होईल. नंतर 23 जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल आणि उभे रिंगण असे दोन्ही सोहळे पार पडतील. त्यानंतर वाखरी येथे पालखी मुक्काम करेल. तर 24 जुलै रोजी आषाध दशमीच्या मुहूर्तावर सर्व संतांच्या पालख्यांसह माऊलींची पालखी पंढरपुरात विठुरायाच्या भेटीसाठी दाखल होईल.










