Ringan Sohala: तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की, उभे आणि गोल रिंगण म्हणजे नेमके काय? रिंगणात अश्व का धावतो? तसेच वारकरी अश्वाच्या टापांखालची (पायाखालील) माती कपाळाला लावून घरी का घेऊन जातात? चला तर, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या खास लेखातून.
आषाढी वारी म्हटलं की डोळ्यांसमोर उभे राहतात लाखो वारकरी, टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तीने भारलेले वातावरण. या वारीतील भावस्पर्शी सोहळ्यांपैकी एक म्हणजे रिंगण सोहळा. या सोहळ्याची परंपरा, त्यामागची श्रद्धा काय आणि महत्त्व जाणून घेण्यासाठी अनेक भाविक उत्सुक आहेत. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, उभे आणि गोल रिंगण म्हणजे नेमके काय? रिंगणात अश्व का धावतो? तसेच अश्वाच्या पायाखालची माती वारकरी कपाळाला लावून घरी का घेऊन जातात? चला तर, जाणून घेऊया सर्व प्रश्नांची उत्तरे.
रिंगण म्हणजे काय?
रिंगण हा केवळ एक सोहळा नसून वारकऱ्यांच्या भावनिक, श्रद्धेचा आणि भक्तीचा उत्सव आहे. पंढरीच्या वारीमध्ये हजारो वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने या सोहळ्यात सहभागी होतात. टाळ, मृदुंग, अभंग आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो.
दिवसभर पायी चालून आलेल्या वारकऱ्यांसाठी रिंगण सोहळा हा उत्साह आणि आनंदाचा क्षण असतो. या वेळी भजन, कीर्तन, भारुडे, फुगडी यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांमधून भक्तीचा अनुभव घेतला जातो. रिंगणाचे मुख्यतः दोन प्रकार असतात गोल आणि उभे रिंगण असतात.
हेही वाचा: स्वस्तात मस्त! RailOne ॲपवर जनरल तिकीट बुक करा आणि मिळवा ३% सूट; पण फक्त ‘या’ एका अटीवर
गोल रिंगण म्हणजे काय?
गोल रिंगणात मैदानाच्या मध्यभागी संतांच्या पादुका किंवा पालखी ठेवली जाते. त्यानंतर मानाचा अश्व ठरावीक मार्गाने गोलाकार धाव घेतो. वारकरी परंपरेनुसार, हा मानाचा अश्व संतांच्या उपस्थितीचे प्रतीक मानला जातो. काही वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की, संत या अश्वावर विराजमान होऊन भक्तांना आशीर्वाद देतात. त्यामुळे अश्वाला विशेष सन्मान दिला जातो.
उभे रिंगण म्हणजे काय?
उभे रिंगण हे गोल रिंगणापेक्षा वेगळ्या पद्धतीने पार पडते. या प्रकारात वारकरी आणि दिंड्या एका रांगेत उभ्या राहतात. त्यांच्यामधून मानाचा अश्व सरळ मार्गाने धावत जातो.
या वेळी अनेक वारकरी हरिनामाचा जयघोष आणि ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या घोषणांनी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जातो. आणि उभे रिंगण हेही वारकरी परंपरेतील महत्त्वाचा भाग मानले जाते.
अश्वाच्या पायाखालची माती कपाळाला का लावतात?
रिंगण संपल्यानंतर वारकरी अश्वाच्या पायाखालची (टापांखालची) माती श्रद्धेने कपाळाला लावतात आणि काही जण ती माती घरी घेऊन जातात.
वारकरी श्रद्धेनुसार, मानाच्या अश्वाने स्पर्श केलेली ही माती पवित्र मानली जाते. संतांच्या सान्निध्यामुळे ती पावन झाल्याची भावना भाविकांच्या मनात असते. त्यामुळे ही माती प्रसादाप्रमाणे जपून ठेवली जाते.
रिंगण सोहळ्याचे महत्त्व
रिंगण हा केवळ धार्मिक विधी नाही, तर वारकरी संप्रदायातील एकता, शिस्त आणि भक्तीचे प्रतीक आहे. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करताना वारकऱ्यांना या सोहळ्यातून नवी ऊर्जा आणि उत्साह मिळतो.
विठ्ठलाच्या भेटीची आस, संतांच्या परंपरेवरील श्रद्धा आणि सामूहिक भक्तीचा अनुभव देणारा रिंगण सोहळा हा आषाढी वारीचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच लाखो वारकरी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात.







