Nitin Gadkari | मागील काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना धमकी दिल्याची घटना घडली होती. नितीन गडकरींना फोनवरून 100 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता. तर आता गडकरींना धमकी देणं आरोपीला चांगलंच भोवलं आहे. कारण त्यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि त्यांना खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा – LPG गॅस संकट टळणार? होर्मुझ ओलांडून दोन जहाजे भारताकडे रवाना, आणखी एका जहाजाची होणार एन्ट्री
नेमकं प्रकरण काय?
आरोपी जयेश पुजारीने काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून 100 कोटी आणि 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. तसेच खंडणी दिली नाही तर बॉम्बस्फोट घडवून नितीन गडकरींना देखील ठार मारण्याची धमकी दिली होती. तर आरोपी जयेश पुजारी हा हत्येच्या गुन्ह्यासाठी कर्नाटकच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिक्षा भोगत असतानाच त्याने तुरुंगातील मोबाईल फोनवरून गडकरींच्या कार्यालयात फोन केला होता आणि धमकी दिली होती.
आता नितीन गडकरींना धमकी देणं आरोपी जयेश पुजारीला चांगलंच महागात पडलं आहे. कारण आरोपी जयेश पुजारीला नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, नितीन गडकरी हे नेमही काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतात. आताही ते एका आणखी कारणामुळे चर्चेत आले आहेत. नितीन गडकरी हे 14 आणि 15 मे रोजी महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची पाहणी करणार आहेत. यादरम्यान नितीन गडकरी यांच्यासोबत पाहणीसाठी वाहनांचा मोठा ताफा नसणार आहे. गडकरी आपल्या ताफ्याऐवजी पाहणीसाठी बसचा वापर करणार आहेत. याबाबत गडकरींनी पुणे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, माझ्या पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासह पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी एका बसची व्यवस्था करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.












