Protest Erupts at Modern College Pune: नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे. तसतसे या प्रकरणाचे पडसाद आता पुण्यातही उमटू लागले आहेत. मॉर्डन कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांनी अटक झाल्यानंतर एनएसयूआय आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी कॉलेजसमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी कॉलेज प्रशासन आणि प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
विद्यार्थ्यांची कोणती मागणी आहे?
आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान तसेच प्राचार्य निवेदिका एकबोटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
एनएसयूआयकडून या प्रकरणात अजूनही काही मुख्य आरोपी बाहेर असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. कॉलेज प्रशासनाच्या भूमिकेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी विविध फलक आणि पोस्टर्सच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
प्रशासनाने याप्रकरणी स्पष्टीकरण देत म्हटले की…
दरम्यान, मॉडर्न कॉलेज प्रशासनाने याप्रकरणी स्पष्टीकरण देत म्हटले की, मनीषा मांढरे या कनिष्ठ विभागात जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या अनुभवाच्या आधारे त्यांची नीट परीक्षेशी संबंधित काही गोपनीय कामांसाठी निवड करण्यात आली होती. मात्र प्रश्नपत्रिका गैरव्यवहारात त्यांचा सहभाग समोर आल्याने ही बाब गंभीर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
तसेच, संबंधित प्रक्रियेत महाविद्यालयाचा थेट सहभाग नसल्याचा दावा करत, नियमानुसार अंतर्गत चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असेही कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.












