• Home
  • राजकारण
  • पार्थ, रोहित, तटकरेंच्या फडणवीस भेटींची चर्चा; महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे?
ताज्या बातम्या

पार्थ, रोहित, तटकरेंच्या फडणवीस भेटींची चर्चा; महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे?

Maharashtra Power Circles

Rising Political Meetings in Maharashtra Power Circles: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि नेत्यांच्या गाठीभेटी हा चर्चेचा विषय ठरलाय. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष, रोहित पवारांचे राजकीय दावे, पटेल तटकरे या नेत्यांचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच नवनवीन खुलासे घेऊन येत आहे, मात्र या सगळ्यात देवा भाऊंचा काय तरी गेम आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण सुनील तटकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर पार्थ पवार यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती असतांनाच आज रोहित पवार हे फडणवासांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. काय आहे या भेटीमागे राजकीय गणित? हे येत्या काही दिवसांत समोर येतील.

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसमधील म्हणजेच अजित पवार गटात, अंतर्गत वाद आणि नाराजीनाट्य सध्या रंगात आलं आहे. असं असतांनाच पार्थ पवार यांनी १६ तारखेला रात्रीच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईतील निवासस्थानी गुप्त भेट घेतली होती. या भेटीनंतर रविवारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी या भेटीला दुजोरा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आम्ही महायुतीमध्ये एकत्र आहोत”. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप हे मित्र पक्ष असल्यामुळे त्यांच्या नेत्यांनी भेटणे अत्यंत स्वाभाविक आहे. महायुतीचे नेते एकमेकांना नियमितपणे भेटत असतात, त्यामुळे पार्थ पवार मला येऊन भेटले ही काही फार मोठी बातमी नाही किंवा यात काहीही विशेष नाही, असं सांगत त्यांनी या भेटीतील राजकीय गांभीर्य किंवा पक्षांतर्गत वादाच्या चर्चा फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा: आधी दांडक्यांनी मारलं, मग नवले पुलावरून फेकलं! पुण्यात चाललंय काय? पाहा हा धक्कादायक व्हिडिओ

सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

तर पार्थ पवारांच्या भेटीनंतर दोन दिवसांनी, म्हणजे कालच सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांची भेट घ्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर लगेचच रात्री त्यांनी मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थान गाठले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून निर्माण झालेल्या अंतर्गत वादानंतर अवघ्या ४८ तासांच्या अंतराने या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची वेगवेगळ्या दिवशी भेट घेतली आहे.

सुनील तटकरे यांच्याशी झालेल्या भेटीबाबत मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणताही अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. ही भेट पूर्णपणे ‘गुप्त’ आणि अनौपचारिक ठेवण्यात आली होती. परंतु, राजकीय वर्तुळातील सूत्रांनुसार ही भेट देखील महायुतीमधील जागावाटप, आगामी राजकीय रणनीती आणि प्रशासकीय कामांच्या समन्वयासाठीच झाली असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन यादीत

पार्थ पवार आणि सुनील तटकरे या दोन प्रमुख नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटींमागे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस सर्वात महत्त्वाचे कारण मानली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन यादीतून राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावे वगळण्यात आली होती.

पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याला केवळ एक तांत्रिक किंवा टायपिंगची चूक असल्याचं म्हटलं असलं, तरी या घटनेमुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तर आज रोहित पवार हे फडणवासांच्या भेटीला गेले आहेत, या भेटीमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र राजकारणात काहीतरी नवीन घडणार असं अनेकदा रोहित पवार यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता या भेटीमागचे नेमके कारण काय हे पाहन महत्वाच ठरणार आहे.

विविध मुद्द्यांवर चर्चा

महाराष्ट्रातील सध्याचे राजकीय चित्र पाहता सत्तेचे केंद्रबिंदू देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती असल्याचे दिसत आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये आणि सरकार स्थिर राहावे यासाठी ते विविध नेत्यांशी स्वतंत्रपणे संवाद साधत असल्याचे समजते. त्यामुळे पार्थ पवार, सुनील तटकरे तसेच विरोधी गटातील रोहित पवार यांसारखे नेतेही विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी फडणवीस यांची भेट घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुढे कोणते वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts