Sanjay Shirsat Statement: विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत हालचालींमुळे राजकीय वातावरण तापले असून मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने नव्या चर्चाना उधाण आले आहे.
छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ही जागा पूर्वीपासून शिवसेनेकडे असल्यानेती कायम ठेवण्यावर शिंदे गट ठाम असल्याचे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. “संख्याबळ कितीही असले तरी ही जागा आम्ही सोडणार नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा: ओबीसी आरक्षणाच्या 1994 निर्णयावर प्रश्नचिन्ह; जरांगे पाटलांचे वक्तव्य काय?
महायुतीत मोठा तणाव
दरम्यान, नाशिक मतदारसंघावरूनही महायुतीत तणाव वाढल्याची चर्चा आहे. भाजपाकडून संख्याबळाच्या आधारावर या जागेवर दावा करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्मुला ठरताना महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादीतील काही जण शिवसेनेच्या संपर्कात
याचवेळी संजय शिरसाट यांनी केलेल्या आणखी एका दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांमध्ये आता या वक्तव्यामुळे आणखी भर पडली आहे.
महायुती आणि मित्रपक्षांमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होणार का?
काही आमदार आणि नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याच्या चर्चाही रंगत असताना शिरसाट यांच्या विधानाकडे राष्ट्रवादीतील अस्वस्थता पुन्हा चर्चेत आली आहे. त्यामुळे आगामी काळात काळात महायुती आणि मित्रपक्षांमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून संघटनात्मक बांधणीवरही भर दिला जात आहे. तालुकानिहाय बैठका आणि पक्षबांधणीची मोहीम सुरू असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची तयारी सुरू असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
शिरसाटांच्या वक्तव्यावरून मुश्रीफ आक्रमक
मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी शिरसाटांवर टीका करत, “ते आमच्या पक्षाबद्दल अशा पद्धतीने कसे बोलू शकतात?” असा सवाल उपस्थित केला.
मुश्रीफ यांनी सांगितले की, यापूर्वीही त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडे शिरसाट यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. “आमच्या पक्षातील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करण्याचा अधिकार शिरसाटांना नाही. त्यांना आवर घालण्याची गरज आहे,” असेही त्यांनी म्हटले.
तसेच, समन्वय समितीच्या आगामी बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत अधिकृत तक्रार करणार असल्याचा इशाराही मुश्रीफ यांनी दिला. शिरसाट यांनी वारंवार अशा प्रकारची वक्तव्ये केल्याने महायुतीतील वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












