HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या, 1 जुलैपासून नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असून RTOमध्ये मोठे बदल लागू होणार आहेत. तसेच अनेक महत्त्वाच्या सेवा बंद केल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील वाहनधारकांची अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP Number Plate) बसवण्यासाठी सरकारने दिलेली अंतिम मुदत 30 जून 2026 रोजी संपत आहे. त्यानंतर 1 जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की मुदत संपल्यानंतर पोलीस आणि RTO अधिकारी संयुक्तपणे रस्त्यावर उतरून कारवाई करतील. तसेच HSRP नसलेल्या वाहनांवर केवळ दंडच नाही, तर आरटीओतील अनेक महत्वाच्या सेवांवरही निर्बंध घालण्यात येणार आहेत.
हेही वाचा: TET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला बिहारमधून अटक; तपासाला नवं वळण
१ जुलैपासून RTO मधील सेवा बंद
HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांना मोठा फटका बसणार आहे. अशा वाहनांसाठी पुढील सेवा उपलब्ध राहणार नाहीत
– वाहन हस्तांतरण (Ownership Transfer)
– पत्ता बदल (Address Change)
– हायपोथिकेशन चढवणे/काढणे (Loan Entry/Removal)
– पुनर्नोंदणी (Re-registration)
– इतर वाहन बदल संबंधित प्रक्रिया
– परवाना नूतनीकरणाशी संबंधित सेवा
मात्र, वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ही अट सध्या लागू होणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
नोंदणी केलेल्यांना दिलासा
ज्या वाहनधारकांनी ३० जूनपूर्वी अधिकृत पोर्टलवर HSRP साठी नोंदणी करून अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांना तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. मात्र, ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल. राज्यात HSRP बसवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तीन झोन करण्यात आले असून, कामासाठी अधिकृत कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
HSRP नंबर प्लेटचे अधिकृत दर
सरकारने नागरिकांवरील अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी खालील दर निश्चित केले आहेत .
दुचाकी: ४५० रुपये
तीनचाकी : ५०० रुपये
कार व हलकी व्यावसायिक वाहने : ७४५ रुपये
हे दर जीएसटी वगळून असून त्यामध्ये फिटमेंट शुल्क समाविष्ट आहे.
दंड आणि नियम
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ आणि मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पोलीस आणि परिवहन विभाग संयुक्तपणे ही मोहीम राबवणार आहेत.
शासकीय वाहनांनाही नियम लागू
राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय वाहनांवरही ३० जूनपूर्वी HSRP बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा त्यांच्यवरही कारवाई केली जाणार आहे.
एकूणच, वाहनधारकांनी दंड टाळण्यासाठी आणि आरटीओतील अडचणी टाळण्यासाठी तात्काळ HSRP नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.






