Mumbai: मुंबईत २३ ते ६ ऑगस्टदरम्यान कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या काळात जमावबंदी, मिरवणुका आणि काही उपक्रमांवर निर्बंध असतील, तर अनेक आवश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
मुंबईत कायदा व सुव्यवस्था शांत राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण पोलीस आयुक्तालय हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच मिरवणूकींवर देखील निर्बंध असतील.
मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत हा आदेश जारी केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संभाव्य शांतताभंग, सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका आणि जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाय म्हणून हे निर्बंध लागू करण्यात आले आहे.
हेही वाचा: ABHA कार्ड मोबाईलमध्ये ठेवायचंय? मग फॉलो करा या 3 सोप्या स्टेप्स
कोणत्या गोष्टींवर बंदी?
२३ जुलै रोजी मध्यरात्री १२: ०१ वाजल्यापासून ६ ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत पुढील निर्बंध लागू राहतील:
सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास निर्बध आहेत.
कोणत्याही प्रकारच्या मोर्चा किंवा मिरवणुका काढण्यास बंदी.
लाउडस्पीकर, ध्वनीवर्धक आणि तत्सम उपकरणांच्या वापरावर निर्बंध.
मिरवणुकांमध्ये बँड वाजवणे आणि फटाके फोडण्यास मनाई.
कोणत्या उपक्रमांना सूट?
सामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही उपक्रमांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
विवाह सोहळे आणि त्यासंबंधित कार्यक्रम.
अंत्यविधी आणि अंत्ययात्रा.
कंपन्या, उद्योग, दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि कारखान्यांचे नियमित कामकाज.
न्यायालये, सरकारी कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज.
शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांचे नियमित वर्ग.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि इतर सार्वजनिक मनोरंजनस्थळांवरील नियोजित कार्यक्रम.
संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांची (DCP) पूर्वपरवानगी घेतल्यास इतर सभा किंवा मिरवणुकाही आयोजित करता येतील.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. बंदीच्या कालावधीत नोंदविण्यात आलेल्या प्रकरणांचा तपास निर्बंध संपल्यानंतरही सुरू राहील आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
या आदेशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस ठाणे, न्यायालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सूचना फलक लावण्यात येत असून, प्रसारमाध्यमे आणि सार्वजनिक घोषणांद्वारेही जनजागृती केली जात आहे.









