Vastu Tips for Home: तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढत चालली आहे का? सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असतील, तर वास्तुशास्त्रानुसार या ५ वस्तू घरात ठेवा. यामुळे घरात सुख-शांती आणि सकारात्मक वातावरण राहण्यास मदत होते.
घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून प्रत्येकाच्या भावना, आठवणी आणि आनंदाचे केंद्र असते. मात्र, अनेकदा घरातील सततचे वाद, तणाव आणि नकारात्मक वातावरणामुळे शांतता भंग होत असल्याचे जाणवते. अशावेळी अनेक जण वास्तुशास्त्रातील उपायांकडे वळतात.
वास्तुशास्त्रानुसार, घरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी काही शुभ वस्तू योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवण्याची मान्यता आहे. या वस्तूंमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास, सुख-शांती वाढण्यास आणि समृद्धी येण्यास मदत होते, असे मानले जाते. चला तर जाणून घेऊया, घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी वास्तुनुसार कोणत्या ५ वस्तू ठेवणे शुभ मानले जाते.
हेही वाचा: पेपरफुटी प्रकरणांवर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले? वाचा
शंख
शंखाला धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. नियमित शंखनाद केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते, अशी मान्यता आहे. तसेच घरात शंख ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा लाभते आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला होतो, असे मानले जाते.
हंसाची जोडी
हंसाची जोडी ही प्रेम, सौहार्द आणि कौटुंबिक ऐक्याचे प्रतीक मानली जाते. घरातील हॉल किंवा पाहुण्यांच्या खोलीत हंसाच्या जोडीचे चित्र किंवा मूर्ती ठेवल्यास घरात शांततेचे वातावरण निर्माण होते.
बासरी
भगवान श्रीकृष्णाशी संबंधित बासरीला शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला बासरी ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे.
धातूचे कासव
वास्तुशास्त्रात कासवाला प्रगती, दीर्घायुष्य आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. पितळ, तांबे किंवा चांदीचे कासव पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवून ते उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. कासवाचे तोंड घराच्या आतील बाजूला असावे.
धातूचा हत्ती
धातूपासून बनवलेला हत्ती हा वैभव आणि स्थैर्याचे प्रतीक मानला जातो. घरात चांदी, पितळ किंवा तांब्याचा हत्ती ठेवणे शुभ मानले जाते. विशेषतः चांदीचा हत्ती ठेवल्याने नकारात्मक ग्रहांचा प्रभाव कमी होतो.
लक्षात ठेवा
वास्तुशास्त्रातील हे उपाय पारंपरिक श्रद्धा आणि धार्मिक मान्यतांवर आधारित आहेत. याबाबतचे दावे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले असतीलच असे नाही. त्यामुळे अशा उपायांकडे श्रद्धा आणि वैयक्तिक विवेकाच्या दृष्टीने पाहणे योग्य ठरेल.









