Clay Pot Buying Tips: मातीचा माठ आणि मातीची भांडी खरेदी करताना अनेक जण फक्त गुणवत्ता पाहतात, मात्र पारंपरिक मान्यतांनुसार दिवस आणि वेळेचीही काळजी घेतली जाते. मातीची भांडी खरेदी करण्याची योग्य पद्धत, कोणते दिवस टाळावेत आणि चांगले भांडे कसे ओळखावे जाणून घ्या.
आजही अनेक घरांमध्ये मातीचा भांड्यांचा वापर केला जातो. मातीच्या माठातील पाणी आरोग्यसाठी फायदेशीर मानले जाते, तसेच मातीच्या भांड्यात तयार केलेले अन्न अधिक चविष्ट आणि नैसर्गिक असल्याचे अनेकांचे मत आहे.
मात्र भांडी खरेदी करताना त्याचा आकार आणि गुणवत्ता पाहणे पुरेसे नाही. वास्तुशास्त्र आणि पारंपरिक मान्यतांनुसार भांडी खरेदी करण्यासाठी योग्य दिवस आणि वेळ निवडण्यासही महत्व दिले जाते.
कोणत्या दिवशी मातीची भांडी खरेदी करणे टाळावे?
वास्तुशास्त्रातील काही मान्यतांनुसार,रविवार आणि मंगळवारी मातीची भांडी खरेदी करणे टाळावे असे सांगितले जाते. कारण मंगळवारचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडला जातो आणि पृथ्वी तत्वाशी त्याचा संबंध असल्यामुळे या दिवशी मातीच्या वस्तू घरात आणणे काही ठिकाणी अशुभ मानले जाते.
तसेच काही पारंपरिक मतांनुसार शनिवारी देखील मातीची भांडी खरेदी करू नये असा सल्ला दिला जातो.
सूर्यास्तानंतर मातीची भांडी का घेऊ नयेत?
मान्यतेनुसार मातीची भांडी खरेदी करण्यासाठी दिवसाचा वेळ अधिक योग्य मानला जातो. सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी किंवा रात्री मातीची नवीन भांडी घरी आणणे टाळावे असे काही लोक मानतात.
नवीन माठ, कुंडी किंवा इतर मातीची भांडी खरेदी करताना दिवसाचा उजेड असताना खरेदी केल्यास भांड्याची गुणवत्ता तपासणेही सोपे जाते.
रंगीत आणि चमकदार भांड्यांपासून सावध राहा
मातीची भांडी खरेदी करताना आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. बाजारात अनेक आकर्षक रंगांची आणि चमकदार पॉलिश केलेली मातीची भांडी उपलब्ध असतात.
अशा भांड्यांवर वापरलेले काही रासायनिक रंग किंवा कोटिंग आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. विशेषतः पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणारा माठ किंवा भांडे निवडताना नैसर्गिक आणि साधे मातीचे भांडे घेणे अधिक योग्य ठरते.
चांगल्या दर्जाचे मातीचे भांडे कसे ओळखावे?
मातीचे भांडे खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे.
भांड्यावर हलकेच टिचकी मारून त्याचा आवाज तपासा.
स्पष्ट आणि टणक आवाज येत असेल तर भांडे चांगल्या प्रकारे भाजलेले असण्याची शक्यता असते.
मंद किंवा बोथट आवाज येणारे भांडे कच्चे असू शकते.
खरेदी करण्यापूर्वी भांड्यात पाणी भरून गळती होत नाही ना हे तपासावे.
भांड्यांचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी
मातीची भांडी पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पर्याय मानली जातात. मात्र त्यांचा वापर करताना स्वच्छता आणि योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. मातीची भांडी खरेदी करताना गुणवत्ता, स्वच्छता आणि वापराचा उद्देश लक्षात घेतल्यास त्याचा अधिक चांगला फायदा मिळू शकतो.









