E20 Janata Party : देशातील राजकीय आणि डिजिटल आंदोलनांच्या इतिहासात सध्या सोशल मीडिया हे एक नवं आणि सर्वात मोठं हत्यार बनलंय… काही दिवसांपूर्वीच NEET पेपर लीक प्रकरणावरून तरुण आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत जंतर-मंतरवर एका अनोख्या आंदोलनाची सुरुवात केली होती, ज्याला ‘कॉकरोच जनता पार्टी’ असं नाव देण्यात आलं. या उपरोधिक आणि आक्रमक डिजिटल मोहिमेने इतका मोठा दबाव निर्माण केला की, शेवटी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाच्या अभूतपूर्व यशानंतर आता सोशल मीडियावर तशाच स्वरूपाची, पण एका पूर्णपणे वेगळ्या आणि थेट जनतेच्या खिशाला कात्री लावणाऱ्या मुद्द्यावरून नवी मोहीम उभी राहिली आहे, जिचं नाव आहे ‘E20 जनता पार्टी’… काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि या पार्टीच्या काय मागण्या आहेत?
मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या तिरंगा सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा उपरोधानं ‘खड्डामंत्री’ असा उल्लेख केला. आपले खड्डामंत्री सध्या देशाचे प्रश्न सोडवण्याऐवजी फक्त इथेनॉलवर बोलत आहेत असा हल्लाबोल करत पुढचा आंदोलनाचा विषय हाच असणार आहे अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली…
या नवीन डिजिटल मोहिमेनं इंटरनेटवर पाऊल ठेवताच अवघ्या काही मिनिटांत आणि तासांत हजारो फॉलोअर्स गोळा केले आहेत. पेट्रोल पंपांवर मिळणाऱ्या इंधनामध्ये सरकारच्या नव्या धोरणानुसार केल्या जाणाऱ्या २०% इथेनॉल मिश्रणाला या मोहिमेद्वारे जोरदार विरोध दर्शवला जात आहे. या समस्येने आता केवळ सोशल मीडियापुरतं मर्यादित न राहता थेट सरकारचं टेन्शन वाढवलंय.. कारण या आंदोलनाला सामान्य वाहनधारकांसह विविध ट्रान्सपोर्ट संघटनांचाही पाठिंबा मिळू लागलाय….
हेही वाचा : NEET नंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही चर्चेत; उमेदवारांचे पुराव्यांसह पेपर फुटीचा गंभीर आरोप
E20 जनता पार्टी म्हणजे काय? ( E20 Janata Party )
आता या पार्टीचा उदय कसा झाला तर ”E20 जनता पार्टी‘ ही कोणतीही निवडणूक लढवणारी अधिकृत राजकीय संघटना किंवा नोंदणीकृत पक्ष नाही, तर तो सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक आणि ग्राहक हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांचा एक डिजिटल ग्राहक हक्क मंच आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ आणि इन्स्टाग्रामवर या मोहिमेची खाती उघडण्यात आली.., पाहता पाहता या अकाऊंट्सचे फॉलोअर्स झपाट्याने वाढले आहेत. E20 जनता पार्टी या एक्स खात्यावर 22 हजारांहून अधिक, तर इन्स्टाग्रामवर 30 हजारांपेक्षा जास्त लोकांनी फॉलो केले आहे.’कॉकरोच जनता पार्टी’ने ज्याप्रमाणे मीम्स, उपरोधिक विधाने आणि थेट प्रश्नांच्या माध्यमातून जनमानसात स्थान मिळवलं, अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून ‘E20 जनता पार्टी’ देखील पुढे जातेय.
E20 जनता पार्टीच्या प्रमुख मागण्या : ( E20 Janata Party )
E20 जनता पार्टीच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते आपण पाहुयात…
1. E20 सोबतच 100% शुद्ध आणि इथेनॉलमुक्त पेट्रोलचा पर्याय
2. इंधन निवडण्याचा अधिकार ग्राहकाला असावा
3. लेबलवर इथेनॉल मिश्रणाची अचूक टक्केवारी असावी
4. E20 इंधनाचा स्वतंत्र रिसर्च डेटा सार्वजनिक करा
5. E20 इंधनाची किंमत शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असावी
E20 आंदोलनाचा सरकारवर काय परिणाम होऊ शकतो?
Nitin Gadkari : या मोहिमेमुळे मोदी सरकार आणि विशेषतः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. ‘कॉकरोच जनता पार्टी’ने ज्या आक्रमक पद्धतीने शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती आणि ती यशस्वी करून दाखवली, त्याच धर्तीवर आता ‘E20 जनता पार्टी’ने थेट नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची आणि त्यांच्या इंधन धोरणात बदलाची मागणी सुरू केली आहे. सोशल मीडियावर “धर्मेंद्र प्रधान गेले, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा का?” अशा प्रकारच्या पोस्ट्स आणि हॅशटॅग्स मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत.
या वादाला आता राजकीय रंगही चढू लागला आहे. विरोधी पक्षांनी या डिजिटल आंदोलनाचा आधार घेत सरकारला धोरणात्मक पातळीवर घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच, दिल्ली आणि परिसरातील टॅक्सी मालक, ऑटो संघटना आणि पर्यटन वाहतूक दलांनी या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. रोज शेकडो किलोमीटर गाड्या चालवणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे या इंधनामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने, त्यांनी ४ ऑगस्ट रोजी देशाच्या संसद भवनावर एका मोठ्या भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. डिजिटल मंचावरून सुरू झालेले हे आंदोलन आता थेट रस्त्यावर आणि संसदेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचणार असल्याने सरकारच्या चिंतेत भर पडलीय…
एकंदरीत पाहता, ‘E20 जनता पार्टी’ने देशातील कोट्यवधी वाहनचालकांच्या खिशाशी आणि रोजच्या जगण्याशी निगडित असलेल्या मुद्द्याला हात घातला आहे. सरकारने जरी हे धोरण राष्ट्रीय हिताचे असल्याचे सांगितले असले, तरी ग्राहकांना त्यांच्या आवडीचे इंधन निवडण्याचा अधिकार असावा ही मागणी सर्वसामान्यांना पटणारी ठरत आहे. सोशल मीडियावरून वेगाने पसरत असलेले हे डिजिटल वादळ येणाऱ्या काळात सरकारला आपली भूमिका बदलण्यास भाग पाडणार की सरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहणार, आता या मोहिमेचे पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









