Monsoon Skincare Tips: राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या दमट वातावरणामुळे त्वचेच्या समस्या वाढू शकतात. मात्र, काही सोप्या उपायांनी त्वचेचा नैसर्गिक चमक आणि आरोग्य टिकवता येते. जाणून घ्या पावसाळ्यातील खास स्किनकेअर टिप्स.
पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते. सततचा पाऊस, दमट हवा आणि बदलते हवामान याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. या काळात त्वचा चिकट होणे, मुरुम येणे, खाज सुटणे, पुरळ येणे किंवा त्वचा निस्तेज दिसणे अशा समस्या अनेकांना जाणवतात. त्यामुळे पावसाळयात त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
पावसाळ्यात त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी काही सोप्या स्किनकेअर टिप्स फॉलो (Monsoon Skincare Tips) केल्यास त्वचेच्या अनेक समस्या टाळता येतात.
हेही वाचा: लोकसभा-राज्यसभेत वंदे मातरम् विधेयक मंजूर; अपमान केल्यास किती शिक्षा? जाणून घ्या नवीन नियम
चेहरा नियमित स्वच्छ ठेवा
पावसाळ्यात वातारणातील धूळ, प्रदूषण आणि अतिरिक्त तेलामुळे त्वचेवर घाण जमा होऊ शकते. त्यामुळे दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. मात्र वारंवार चेहरा धुणे टाळावे, कारण त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक आोलावा कमी होऊ शकतो.
माॅइश्चरायझर वापरणे विसरू नका
पावसाळ्यात हवेत आोलावा असला तरी त्वचेला योग्य हायड्रेशनची गरज असते. त्वचेच्या प्रकारानुसार हलके आणि नाॅन- ग्रीसी मॉइश्चरायझर वापरावे. यामुळे त्वचा कोरडी होण्यापासून बचाव होतो आणि त्वचेची नैसर्गिक पोत टिकून राहतो.
सनस्क्रीन लावणे गरजेचे
पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असला तरी हानिकारक UV किरणांचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी SPF असलेले सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे. ढगाळ वातावरणातही सनस्क्रीन वापरणे त्वचेच्या संरक्षणासाठी फायदेशीर ठरते.
त्वचा एक्सफोलिएट करा
मृत त्वचेची पेशी काढण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सौम्य स्क्रब किंवा एक्सफोलिएटरचा वापर करता येतो. यामुळे त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसण्यास मदत होते. मात्र जास्त प्रमाणात स्क्रब केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते.
पाणी भरपूर प्या
त्वचेचे आरोग्य केवळ बाहेरून काळजी घेतल्याने सुधारत नाही, तर शरीरातील पाण्याची पातळीही महत्वाची असते. पावसाळ्यात तहान कमी लागली तरी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.
मेकअप करताना काळजी घ्या
दमट वातावरणात जास्त मेकअप केल्यास त्वचेची छिद्रे बंद होऊन मुरुम आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात हलका आणि त्वचेला अनुकूल मेकअप वापरणे चांगले.
ओले कपडे आणि टॉवेल वापरणे टाळा
पावसात भिजल्यानंतर ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नयेत. ओलसरपणामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि त्वचेच्या समस्या होण्याची शक्यता वाढते. स्वच्छ आणि कोरडे कपडे वापरणे आवश्यक आहे.
आहाराकडे लक्ष द्या
त्वचेच्या आरोग्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे. फळे, हिरव्या भाज्या, कडधान्ये आणि जीवनसत्त्वांनी भरपूर पदार्थांचा आहारात समावेश करा. तेलकट आणि जंक फूडचे प्रमाण कमी ठेवा.









