Vande Mataram Bill Paased: वंदे मातरम्ला कायदेशीर संरक्षण देणारे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हा कायदा लागू होईल. या नव्या तरतुदीनुसार वंदे मातरम्चा अपमान किंवा गायनात जाणूनबुजून अडथळा निर्माण केल्यास किती शिक्षा मिळणार जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि तरतुदी.
वंदे मातरम्ला कायदेशीर संरक्षण देणारे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाले आहे. राज्यसभेनंतर लोकसभेतही विरोधी पक्षांच्या घोषणाबाजी आणि गदारोळाच्या वातावरणात हे विधेयक संमत करण्यात आले. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाणार असून, त्यांच्या स्वाक्षरीनंतर ते कायद्याच्या स्वरूपात लागू होईल.
राज्यसभेत हे विधेयक २९ जुलै रोजी मंजूर झाले होते, तर लोकसभेने ३० जुलै रोजी त्यावर शिक्कामोर्तब केले. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील घटनात्मक प्रक्रिया म्हणून ते राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल.
हेही वाचा: बॉक्स ऑफिसवर ‘स्पायडर- मॅन: ब्रँड न्यू डे’ चा जबरदस्त धमाका; पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई
विधेयकात नेमकी काय तरतूद आहे?
या विधेयकाद्वारे ‘प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अॅक्ट, १९७१’ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. सध्या या कायद्यानुसार राष्ट्रगीत ‘जन गण मन’ गाताना किंवा वाजवताना जाणूनबूजून अडथळा निर्माण करणे हा गुन्हा मानला जातो. नव्या सुधारणेनंतर ‘वंदे मातरम्’लाही त्याच प्रकारचे कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.
त्यामुळे वंदे मातरम्च्या गायनात मुद्दाम व्यत्यय आणणे, ते थांबवाण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याचा अपमान करणे हे कायद्याने दंडनीय कृत्य ठरेल.
शिक्षेची काय तरतूद?
हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यानंतर वंदे मातरम्चा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करता येणार आहे. अशा प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हीच शिक्षा सध्या राष्ट्रगीताच्या अपमानासंदर्भात लागू आहे.
सरकारची भूमिका
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी 24 जुलै रोजी राज्यसभेत हे विधेयक सादर केले होते. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘वंदे मातरम्’चा सन्मान आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी कायद्यात बदल आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे.
शासकीय कार्यक्रमांबाबत निर्देश
विधेयकानुसार अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् सादर करण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात येणार आहेत. गृह मंत्रालयाने राज्यांना दिलेल्या सूचनांनुसार, ज्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही सादर केले जातील, तेथे प्रथम राष्ट्रगीत सादर करण्यात येईल. त्यावेळी उपस्थितांनी सावधान स्थितीत उभे राहून आदर व्यक्त करणे अपेक्षित असेल.
लोकसभेचे कामकाज तहकूब
लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज पुढील दिवसापर्यंत तहकूब करण्यात आले. या विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाल्याने आता राष्ट्रपतींच्या संमतीनंतर त्याची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.








